‘कोरोना’मुळे यंदा ‘देशी’ होळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:41 AM2020-03-06T11:41:27+5:302020-03-06T11:44:55+5:30
यावर्षी चायनाचे रंग व साहित्य यापेक्षा देशी रंगाची होळी असेल, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.
अकोला : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असताना त्याचा फटका होळीलाही बसणार आहे. यंदा चीनमधून भारतीय बाजारपेठेत येणारी उत्पादने ‘कोरोना’मुळे गत तीन महिन्यांपासून येणे बंद झाली आहेत; मात्र होळीचे साहित्य विकणाऱ्या भारतीय विक्रेत्यांसाठी कोरोना विषाणू लाभदायी ठरत असून, बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली आहे, त्यामुळे यावर्षी चायनाचे रंग व साहित्य यापेक्षा देशी रंगाची होळी असेल, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरवर्षी चीनमधून पिचकारी, ढोल, रंग, टोपी, पुंगी आदी साहित्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते; परंतु यावेळी कोरोनामुळे आयातीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांनी मुंबई, दिल्ली, सुरत या ठिकाणांहून ठोक उत्पादने विक्रीसाठी मागविली आहेत. भारतातील बहुतांश सणांमध्ये चीनहून येणाºया उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते; परंतु यंदा कोरोनामुळे या उत्पादनांना ब्रेक लागला असून, बाजारपेठेत भारतीय उत्पादनांचीच संख्या जास्त आहे.
कोरोनाचा परिणाम हा येणाºया सणांवरदेखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. अनेक वर्षांपासून सणासुदीला चिनी उत्पादनांची मागणी अधिक असल्यामुळे विक्रेते भारतीय उत्पादने कमी प्रमाणात विक्रीसाठी ठेवत असतात; परंतु आता परिस्थितीत बदल झाला आहे. असे असले तरी यंदा होळीच्या बाजारपेठेत मंदी राहणार असल्याचेही काही व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
समाजमाध्यमांमध्येही सुरू आहे जागृती
समाजमाध्यमांवर भारतीय उत्पादने खरेदी करण्याबाबत मोठ्या प्रमाणात संदेश फिरत आहे. चिनी रंगामुळे होणारे परिणाम, चीन-भारत संबंध याला आता करोनाची जोड मिळाली असल्याने ‘नेटकरी’ देशी होळी साठी समाजमाध्यमांवर जागृती करताना दिसत आहे. यामुळेही आधीच बाजारपेठेत उपलब्ध असलेली चिनी उत्पादने कमी प्रमाणात विकली जात आहेत.
कोरड्या रंगाला पसंती
‘कोरोना’ची भीती पसरल्याने ओल्या रंगाऐवजी कोरड्या रंगाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे यंदा व्यापाºयांनी होळीच्या ओल्या रंगाऐवजी कोरडा रंग जास्त प्रमाणात बाजारपेठेत विक्रीला आणला आहे.
चीनमधून येणाºया साहित्याची आयात ठप्प झाल्याने भारतीय उत्पादकांच्या उत्पादनाला मागणी वाढली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा होळीचे रंग व पिचकारीच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे ग्राहक कोरड्या रंगाला पसंती देत आहेत.
- मोहम्मद वसीम, रंग विक्रेता, अकोला.