यंदा बाप्पा पावणार; ५० लाखांच्या उलाढालीचा अंदाज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 10:53 AM2021-09-06T10:53:45+5:302021-09-06T10:55:11+5:30
Ganpati Festival : जिल्ह्यात ५० लाखांच्या जवळपास उलाढाल होण्याचा अंदाज मूर्तिकारांनी व्यक्त केला.
- सागर कुटे
अकोला : गतवर्षी निर्बंधांमुळे मूर्तिकारांच्या बहुतांश गणेश मूर्ती विक्री होऊ शकल्या नाहीत; परंतु यंदा निर्बंध शिथिल झाले असून, वेळेचेही बंधन नाही. गणेश मूर्ती विक्रीची तयारी पूर्ण झाली आहे. तर मोठ्या मूर्तींची बुकिंगही सुरू आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या मूर्तिकारांना यंदा बाप्पा पावणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, जिल्ह्यात ५० लाखांच्या जवळपास उलाढाल होण्याचा अंदाज मूर्तिकारांनी व्यक्त केला.येत्या पाच दिवसांनंतर गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे गणेश मंडळाकडून तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध भागातील गल्ल्यांमध्ये मंडप टाकून स्टेज सजविण्याचे काम सुरू आहे; परंतु गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. गणेश भक्तांसह मूर्तिकारांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मागीलवर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे गणेशोत्सवातही निर्बंध कायम होते. त्यामुळे सायंकाळी ८ पर्यंतच मूर्ती विक्री करता येत होती. त्यामुळे मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले; परंतु यंदा गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
८ सप्टेंबरपासून स्टॉल लागणार
दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानात गणेश मूर्ती विक्रींचे स्टाॅल लागणार आहे. बुधवार, ८ सप्टेंबरपासून हे स्टॉल लागणार असून, जिल्ह्यातील विविध भागातून मूर्तिकार येण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, कोरोनापूर्वी या ठिकाणी १५० स्टॉल लागत होते.
मोठ्या मूर्तींची ९० टक्के बुकिंग
यावर्षी सार्वजनिक मंडळांना ४ फुटापर्यंत उंचीची मूर्ती बसविता येणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांनीही ४ फुटाच्या आतीलच मूर्ती बनविण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत ४ फुटापर्यंतच्या ९० टक्के मूर्तींची बुकिंग पूर्ण झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
दीड लाख मूर्तींची विक्री होण्याची शक्यता
जिल्ह्यातील मूर्तिकारांनी ४ फुटांच्या जवळपास ५ हजार मूर्ती तयार केल्या आहेत. तसेच घरगुती पीओपीच्या १ लाख ३५ हजार मूर्ती व शाळू मातीच्या १० हजार मूर्ती तयार करण्यात आल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
मूर्तिकार म्हणतात...
शासनाच्या निर्देशानुसार ४ फुटांच्या आतीलच मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यावर्षी ४ फुटांच्या ९० टक्के मूर्तींची बुकिंग झाली असून, गणेश मंडळांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे.
- बबलू नारायणे
गतवर्षी मोठ्या प्रमाणात मूर्ती विक्री होऊ शकल्या नाहीत; परंतु यंदा निर्बंध शिथिल झाल्याने विक्री वाढण्याचा अंदाज आहे. गणेश मूर्ती विक्रीसाठी तयार करून ठेवल्या असून, काही विक्रीही झाल्या आहेत.
- मनोज गोटवाल