यंदा होणार विद्यार्थ्यांनी घडविलेल्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना
By Admin | Published: August 21, 2015 12:43 AM2015-08-21T00:43:48+5:302015-08-21T00:43:48+5:30
सामाजिक वनीकरणचा उपक्रम, कृतीतून साकारणार ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’, शाळांना देणार मुर्त्यांचे साचे.
प्रवीण खेते/अकोला : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केवळ जनजागृती नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी सामाजिक वनीकरण विभागाने केली आहे. त्याअनुषंगाने या विभागाने श्रींच्या मूर्तीचे साचे तयार केले आहेत. त्याद्वारे शाळांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांकडून मातीच्या मूर्त्या करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घडविलेल्या श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना यंदाच्या गणेशोत्सवात होणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे नदीमध्ये दरवर्षी मोठय़ा प्रमाणात विसर्जन करण्यात येते. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने त्यांचे अवशेष नदीकाठी भग्नावस्थेत पडून मोठय़ा प्रमाणात विटंबना होते. वर्षानुवर्षे असाच प्रकार सुरू असल्याने नदी पात्रात प्लास्टर ऑफ पॅरिसचा थर साचतो. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरत नसल्याने भूजल पातळी वाढण्यास अडथळा निर्माण होत आहे. पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी दरवर्षी विविध संघटनांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती करण्यात येते. तरीदेखील नागरिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. जनजागृती करूनही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक वनीकरण विभागाने यंदा जनजागृतीसोबतच कृतीवर अधिक भर देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरणाच्या अकोला विभागाने श्रींच्या मूर्तीचे दहा साचे तयार केले आहे. या विभागामार्फत जिल्ह्यातील शाळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. एका प्रशिक्षण वर्गामध्ये दहा शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रत्येक शाळेला दहा दिवसांसाठी एक साचा देण्यात येणार आहे. या साचाच्या साहाय्याने शिक्षक इच्छुक विद्यार्थ्यांंकडून मातीच्या गणेशाची मूर्ती तयार करवून घेणार आहेत. मूर्तीच्या निर्मितीनंतर विद्यार्थी स्वत:च्या कल्पकतेनुसार रंगरंगोटी करतील. त्यामुळे स्वत: गणेशमूर्तीची निर्मिती करून त्याची प्रतिष्ठापना करण्याचा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये वाढण्यास मदत होईल.
अकोल्यातून उपक्रमास प्रारंभ
सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती करण्यात येते; परंतु यंदा प्रत्यक्षात कृती करण्याचे ध्येय सामाजिक वनीकरणाच्या अकोला विभागाने डोळय़ासमोर ठेवले आहे. प्रत्यक्ष कृतीचा हा एक आगळा-वेगळा प्रयोग अकोला विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
असा होईल उपक्रम
या उपक्रमांतर्गत एका कार्यशाळेमध्ये दहा शाळांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित शाळेला दहा दिवसांसाठी प्रत्येकी एक साचा देण्यात येणार असून, दहा दिवसांमध्ये शंभर गणेश मूर्ती तयार होतील. एका शाळेच्या शंभर म्हणजे दहा दिवसात दहा शाळांच्या एक हजार गणेश मूर्ती तयार होतील. दुसर्या दहा दिवसांसाठी इतर दहा शाळांना साचांचे वितरण करण्यात येणार आहे. याप्रमाणे गणेशोत्सवापर्यंंत जास्तीत जास्त शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट सामाजिक वनीकरण विभागाने ठेवले आहे.