यंदा दहावी, बारावी परीक्षेचे क्रीडा, चित्रकलेचे गुण नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 02:11 PM2018-10-07T14:11:47+5:302018-10-07T14:13:00+5:30
अकोला : येणाऱ्या काळात दहावी, बारावी परीक्षेमध्ये काही अंतर्गत बदल होणार आहेत. यंदा होणाºया दहावी, बारावी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा, चित्रकलेचे गुण मिळणार नाहीत.
अकोला : येणाऱ्या काळात दहावी, बारावी परीक्षेमध्ये काही अंतर्गत बदल होणार आहेत. यंदा होणाºया दहावी, बारावी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा, चित्रकलेचे गुण मिळणार नाहीत. त्यामुळे १00 गुणांचे भाषेचे पेपर होतील. केवळ गणित-विज्ञान विषयाचे प्रॅक्टिकलचे गुण मिळतील. त्यामुळे दहावी, बारावी परीक्षेत निकालाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे, असे मत अमरावती विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केले.
रालतो विज्ञान महाविद्यालयात शनिवारी सकाळी आयोजित प्राचार्य, मुख्याध्यापकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळाच्या सहसचिव जयश्री राऊत, वरिष्ठ अधीक्षक अविनाश कन्नमवार, लिपिक सुरेंद्र सिरसाट, संजय चोपडे, राजेंद्र काळे, श्रीमती पेटकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड, रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, विजुक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे होते.
शरद गोसावी म्हणाले, दहावी, बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना काळजी घ्यावी, आपल्या एका चुकीमुळे विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाता कामा नये, त्यासाठी परीक्षा मंडळाचे सर्व नियम, अटी प्राचार्य, मुख्याध्यापकांनी लक्षात घ्यावेत, असे सांगत त्यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना मार्गदर्शन केले.
आढावा सभेमध्ये शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड, प्रा. डॉ. अविनाश बोर्डे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. बोर्डे यांनी शालार्थ पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी परीक्षेला बसतात; परंतु त्यात काही अडचणी आहेत. आई-वडिलांच्या नावांचे स्पेलिंग बदलल्यामुळे पोर्टलवरील लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे जुळत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आॅफलाइन पद्धतीने परीक्षेला बसू द्यावे, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मोडक यांनी केले. आभार डॉ. सौरभ म्हात्रे यांनी मानले.