कृषी विद्यापीठातील मूग, उडीद बीजोत्पादन घटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:54 PM2019-08-01T14:54:19+5:302019-08-01T14:54:23+5:30
अकोला : यावर्षी पावसाने विलंब केल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मूग, उडिदाच्या बीजोत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अकोला : यावर्षी पावसाने विलंब केल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मूग, उडिदाच्या बीजोत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, यावर्षी प्रथमच पावसाअगोदर (ड्राय सोयिंग) पेरणीचा प्रयोग करण्यात आल्याने ३५० एकरावरील पिके उत्तमरीत्या आली आहेत.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सरळ व देशी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विद्यापीठाद्वारे बीजोत्पादन घेतले जाते. अलीकडच्या काही वर्षात ही मागणी आणखी वाढली आहे. यानुषंगाने कृषी विद्यापीठाने बीजोत्पादनाचे क्षेत्रही वाढविले आहे. तथापि, यावर्षी पावसाला विलंब झाल्याने मूग, उडिदाच्या पिकावर परिणाम होेऊन उत्पादन २० ते २५ टक्के घटण्याची शक्यता आहे. कृषी विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी नवीन प्रयोग राबविले जातात. कृषी विद्यापीठाचे क्षेत्र मोठे असल्याने यावर्षी कृषी विद्यापीठाने पावसाअगोदर पेरणीचा प्रयोग केला. जवळपास ३५० एकरावर ही पेरणी करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाला असून, त्यावर सारखा पाऊस सुरू असल्याने ही पिके सर्वात चांगली आली आहेत. मध्यवर्ती संशोधन व मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्रावर ही पेरणी करण्यात आली आहे. दरम्यान, वेळेवर पेरणी केलेल्या मूग, उडीद पिकास आंतरमशागत म्हणून पिकात उगवण पश्चात तणनाशकाची फवारणी न करता, हलकी डवरणी व गरज पडल्यास निंदण करू न तण नियंत्रण करण्यात येत आहे. हाच सल्ला कृषी विद्यापीठानेही शेतकºयांना दिला आहे. मूग, उडीद पिकावरील रस शोषण करणाºया किडीच्या नियंत्रणासाठी २ मिली. ईमीडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही प्रति १० लीटर पाण्यात मिसळून तसेच अगोदर पावसाचा अंदाज घेऊन फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रावरील यावर्षी पिके चांगली आहेत. केवळ पाऊस उशिरा सुरू झाल्याने मूग, उडीद पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.