शरीर सुदृढ राखण्यासाठी योग आवश्यक
By admin | Published: June 22, 2016 01:12 AM2016-06-22T01:12:00+5:302016-06-22T01:12:00+5:30
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी योग दिनी नागरिकांना योगाचा स्वीकार करण्याचे केले अवाहन.
अकोला: नागरिकांनी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी तसेच शरीर सुदृढ राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योगासनाचा समावेश करावा, असा सल्ला पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिला. मंगळवार २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ पदवीदान सभागृहामध्ये आयोजित अकोला जिल्हा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्य़ात मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते.
डॉ. पाटील यांनी उपस्थित योगप्रेमींना योगदिनाच्या शुभेच्छा देवून, आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगाचे महत्व सांगितले. शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या जागतिक धर्म परिषदेत भारतीय संस्कृतीची पर्यायाने योगाची महती सांगितल्याचे उदाहरण दिले. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्याचाच प्रचार प्रसार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर योग दिवसास संयुक्त राष्ट्रसंघाचे माध्यमातून मान्यता प्रदान करू न, जगभर हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास पुढाकार घेतल्याचे सांगितले. तसेच १ जुलै रोजी प्रत्येकाने किमान १ वृक्ष लावून त्याचे संवर्धन करू न, शासनामार्फत राबविण्यात येणार्या वनमहोत्सव या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
हास्यासनाने झाली कार्यक्रमाची सांगता
सभागृहात उपस्थित असलेल्या हजारो योगसाधकांनी ताडासन, वृक्षासन,हस्तपादासन, पद्मासन, वक्रासन, हलासन, चक्रासन, भुजंगासन या आसनांसह कपालभाती, अनुलोम-विलोम,भ्रांमरी, उदगी तसेच विविध प्राणायामाचे प्रकारासह हात, मान व पायाचे व्यायाम केले. कार्यक्रमाची सांगता हास्यासनाने करण्यात आली.
नाश्त्यासाठी उडाला गोंधळ
कार्यक्रमात सहभागी असलेल्या दोन संस्थेच्या वतीने कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर बिस्कीटाचे पुडे तसेच समोस्याचे वाटप करण्यात आले. मात्र, एका प्रवेशद्वारावर बिस्कीटे व दुसर्या मार्गावर समोसे वाटप करणे सुरू असल्याने, दोन्ही पदार्थ मिळविण्याच्या प्रयत्नात विद्यार्थी व योगसाधकांनी गोंधळ उडविला. अतिशय बेशिस्तपणे पदार्थ वाटप करण्यात आले.
शिस्तबध्दतेचा अभाव
सभागृहात उपस्थित योगसाधकांमध्ये लयबध्दता व शिस्तबध्दतेचा अभाव दिसून आला. अनेक साधक योगासन करताना भ्रमणध्वनीवर बोलणे, सेल्फी काढणे, काहींना आसन करणे अवघड झाल्यास हातापायाची नखे कुरतडत बसणे असे प्रकार दिसून आलेत.