युवकाने प्रेमसंबंध नाकारले; युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:01 AM2020-07-15T11:01:12+5:302020-07-15T11:02:43+5:30
आघात सहन न झाल्याने मुलीने पुण्यात गेल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : तालुक्यातील शेळद येथील चुलत बहीण-भावाचे प्रेम संबध असल्याचे कळल्यावर मुलीच्या आईने मुलाच्या घरी जाऊन जाब विचारला असता ‘तो मी नव्हे’ म्हणत, युवकाने मुलीला झिडकारले. हा आघात सहन न झाल्याने मुलीने पुण्यात गेल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी चुलत भाऊ किरण याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या मुलीचे १० आॅगस्ट २०१८ पासून ९ जून २०२० दरम्यान चुलत भाऊ किरण याच्यासोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या आईला मिळाल्यावर तिने मुलाच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. परंतु त्याने प्रेम संबध असल्याचा इन्कार केला आणि मुलीच्या आईला अपमानित करून हाकलून दिले. त्यानंतर मृत मुलीच्या आईने, मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि झाले गेले विसरून जा असे सांगत, २ जून २०२० मोठ्या मुलीकडे भोसरी, पुणे येथे पाठविले. युवकाने नाकारल्यामुळे युवतीला तो आघात सहन झाला नाही. तिने बहिणीच्या घरातच ९ जून २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आईने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देत, मुलीच्या आत्महत्येसाठी प्रियकर किरण हा जबाबदार असल्याचा आरोप केला. तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी मंगळवारी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे.