तरुणांनी बदलत्या संधीचा वेध घेणे गरजेचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:27 AM2017-08-07T02:27:47+5:302017-08-07T02:27:47+5:30
महेश म्हात्रे यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशाने उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर करिअरच्या संधी बदलत गेल्या. तसेच सेवा क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत; परंतु याकडे भारतीयांनी नेहमीच कानाडोळा केला आहे. विकासाची कास धरायची असेल, तर विद्यार्थी, तरुणांनी बदलत्या संधीचा वेध घेणे गरजेचे आहे,असे आवाहन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी रविवारी येथे केले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे रविवारी जठारपेठस्थित उत्सव मंगल कार्यालयात आयोजित ‘नापासांची शाळा’ या कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील बदलते करिअर’ या विषयावर म्हात्रे बोलत होते. यावेळी मुंबई येथील महेश म्हात्रे, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने (पाटील) यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्यांनंतर पहिली १० वर्ष देशाच्या विकासाचा वेग चांगला होता. यानंतर १९६२ मध्ये युद्ध झालं. त्यानंतर पुन्हा उतरत्या कळा लागल्या. मात्र, १९९१ पासून देशाने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि तेथूनच करिअरच्या संधी बदलत गेल्या. सेवा क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत; परंतु याकडे भारतीयांनी नेहमीच कानाडोळा केला आहे. त्यामुळे विकास घडवायचा असेल, तर तरुणाईला या बदलत्या संधींकडे बघण्याची गरज आहे, असेही महेश म्हात्रे म्हणाले.
तरुणाईची स्पर्धा ही वेळेशी सुरू असून, वैयक्तिक पातळीवर आपण आपल्या स्वप्नांचा काय विचार करतो, हे महत्त्वाचे आहे. पण, आपण स्वत: काय आहोत, याचा विचारच आपण करत नसल्याने आपल्याला आपल्या क्षमता कळत नाहीत. आपल्या क्षमता कळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:शी संवाद साधण्याची गरज आहे, असे आवाहन प्रा. सतीश फडके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले यांनी केले. संचालन अनुजा जोशी यांनी, तर आभार मनविसेचे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांनी मानले. यावेळी महानगर अध्यक्ष ललित यावलकर, मनसे महानगर अध्यक्ष सौरभ भगत यांची उपस्थिती होती.