तुमची मदत वाचवू शकते चिमुकल्या तेजसचा प्राण!
By admin | Published: January 7, 2017 02:37 AM2017-01-07T02:37:31+5:302017-01-07T02:37:31+5:30
किडनीचा आजार; गरीब परिस्थितीमुळे तेजसवरील शस्त्रक्रिया थांबली.
अकोला, दि. ६- संकट हे कधीही गरीब, श्रीमंती पाहून येत नाही. संकट आल्यावर श्रीमंत त्यातून मार्ग शोधून काढेल; परंतु गरीब..नाही. गरिबावर आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो. प्रसंगी संकटही त्याच्यावर मात करून जाते. अशीच काहीशी परिस्थिती चिमुकला तेजस डांगे आणि त्याच्या कुटुंबाची झाली आहे. तेजसवर आलेलं संकट कसं परतवून लावायचे, या विचारात तेजसचे आजी-आजोबा आसवं गाळत आहेत. नातवाला वाचविण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत; परंतु या प्रय त्नांना सहृदयी समाजाच्या मदतीची गरज आहे, तुमची छोटीशी मदत, चिमुकल्या तेजसचे प्राण वाचवू शकते.
तेजस शहादेव डांगे (९) हा किनखेड पूर्णा येथील राहणारा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तो तिसरीत शिकतो. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई-वडील दोघेही शेतमजूर. आजी अन्नपूर्णा, आजोबा रामकृष्ण डांगे हेसुद्धा शेतमजुरी करून घराला हातभार लावतात; परंतु दीड महिन्यांपूर्वी तेजस आजारी पडला. अनेक दवाखाने, डॉक्टरांकडे त्याला दाखविले; परंतु आजाराचे निदान झाले नाही. डॉ. प्रशांत मुळावकर यांनी तेजसची तपासणी केल्यावर त्याची एक किडनी निकामी झाली आहे. दुसरी निकामी होण्याच्या मार्गावर आहे; परंतु शस्त्रक्रिया करून ही किडनी वाचविता येईल, असा विश्वास डॉ. मुळावकर यांनी तेजसच्या कुटुंबीयांना दिला; परंतु तेजसच्या घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारे ७0 हजार रुपयेसुद्धा डांगे कुटुंबीयांकडे नाहीत. तेजसचे प्राण वाचले पाहिजेत, यासाठी त्याचे आजी-आजोबा धावपळ करीत आहेत; परंतु मार्ग दिसत नसल्याने ते हतबल झाले आहेत. पोटचा गोळा वाचला पाहिजे. यासाठी मदतीची याचना करीत आहेत; परंतु त्यांना कोठूनही मदत मिळाली नाही. तेजसचे प्राण वाचविण्यासाठी सहृदयी, दानशूर समाजाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. समाजाच्या मदतीमुळे चिमुकल्या तेजसचे प्राण वाचतील आणि त्याच्या चेहर्यावर हसू फुलेल..
तुमचं भरलं आभाळ होईल..
मंदिरामध्ये देणगी देण्यापेक्षा, मंदिरांच्या पायर्या झिजविल्यापेक्षा दु:खितांची सेवा करा. त्यांच्या डोळय़ांतील अश्रू पुसा..हीच खरी ईश्वरसेवा आहे. तेजससुद्धा संकटात सापडला आहे. त्याला आजारातून बरे करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. दुसर्यांना मदत करणार्यांच्या ईश्वर सदैव पाठीशी उभा राहतो. म्हणून प्रसिद्ध कवी प्रवीण दवणेसुद्धा म्हणतात.. त्यांना चार दाणे द्या..तुमचं हिरवं झाड होईल..त्यांना थोडं पाणी द्या..तुमचं भरलं आभाळ होईल..ज्यांच्या अंगणात झुकले ढग..त्यांनी ओंजळ पाणी द्यावे..मग कराल ना, चिमुकल्या तेजसला मदत.. सहृदयी समाजाने मदत देण्यासाठी ९६२३२४२३८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.