तुरीची खरेदी रखडली; व्यापाऱ्यांचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2017 02:11 AM2017-06-01T02:11:54+5:302017-06-01T02:11:54+5:30
अकोला : नाफेडची तूर खरेदी ३१ मेपासून बंद झाली आहे; मात्र अजूनही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा पडून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नाफेडची तूर खरेदी ३१ मेपासून बंद झाली आहे; मात्र अजूनही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा पडून आहे. नाफेडने आता खरेदी नाकारल्याने शेतकऱ्यांकडे रखडलेल्या तुरीवर आता व्यापाऱ्यांचा डोळा लागला आहे. शेतकऱ्यांकडील तूर तीन हजार ते सत्ताविसशे रुपयांनी मागण्यास सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीसाठी ताटकळत बसण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी साडेतीन हजार रुपयांच्या दराने व्यापाऱ्यांना विकली.
आता मात्र नाफेडने खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तूर विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी पडल्या भावात तूर मागण्यास सुरुवात केली आहे.
तूर खरेदीबाबतचे धोरण शासनाचे स्पष्ट नसल्याने यंदा तुरीचे भरपूर पीक असूनही भाव नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून नाफेडची खरेदी होत असतानाच व्यापाऱ्यांनी साडेतीन हजार रुपये क्विंटलच्या भावाने तुरीची खरेदी सुरू केली.
आता तर शेतकरी स्वत:हून व्यापाऱ्यांकडे ओढल्या जाणार असल्याने हे भाव तीन हजार ते सत्ताविसशे रुपयांपर्यत पोहोचले आहेत. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १३० डाळ मिल आहेत. यापैकी बहुतांश डाळ मिल तुरीच्या आहेत, त्यामुळे अकोल्यातच मोठ्या प्रमाणात तुरीची आवश्यकता आहे. काही व्यापाऱ्यांकडे मागील तूर शिल्लक आहे; पण आता कमी भावात तूर मिळत असल्याने तुरीची साठेबाजी होण्याची शक्यता आहे.
शासनाच्या धोरणाकडे व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. शासनाने तुरीच्या निर्यातीवर बंदी घालून, डाळींची मोठ्या प्रमाणात आयात केली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन आले. शासनाचे पुढचे धोरण काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि कर्नाटक या पट्ट्यातही तुरीचे उत्पादन वाढल्याने हा पेच निर्माण झाला आहे.