चोहोगाव येथे युवकावर प्राणघातक हल्ला

By admin | Published: March 11, 2017 02:06 AM2017-03-11T02:06:04+5:302017-03-11T02:06:04+5:30

पंचनाम्यावर स्वाक्षरी केल्याच्या रागातून घडली घटना.

Youth attack in Chowgaw | चोहोगाव येथे युवकावर प्राणघातक हल्ला

चोहोगाव येथे युवकावर प्राणघातक हल्ला

Next

सायखेड(अकोला), दि. १0- गेल्या दीड वर्षांंपूर्वी घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणात पंच म्हणून स्वाक्षरी केल्याच्या कारणावरून चार जणांनी एका युवकावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना ९ मार्चच्या रात्री ७.३0 वाजता चोहोगाव येथील मुख्य चौकात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध बाश्रीटाकळी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी फरार झाले आहेत.
चोहोगाव येथील नीलेश इंगळे याच्यावर एका आदिवासी युवतीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात गजानन गंगाधर गालट या युवकाने पंच म्हणून पंचनाम्यावर स्वाक्षरी केली होती. आपल्याविरुद्ध गजानन गालट याने न्यायालयात साक्ष दिल्याचा गैरसमज नीलेश इंगळे याला झाला. ९ मार्च रोजी गजानन गालट हा गावातील मुख्य चौकात बसलेला होता. त्यावेळी नीलेश इंगळे याने हातातील कुर्‍हाडीने गजानन गालटवर सपासप वार केले. या हल्ल्यात गजानन गालट गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याने कसेबसे आपले घर गाठले. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने बाश्रीटाकळी येथे उपचारार्थ दाखल केले. घटनेची माहिती पोलीस पाटील मनोहर कोहर यांनी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रात्री चोहोगाव गाठून घटनेची माहिती घेतली. तसेच १0 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, प्रिया पाटील, ठाणेदार सतीश पाटील, बीट जमादार राजाभाऊ बचे, पोकॉ रामेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी महादेव गंगाधर गालट यांच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी नीलेश इंगळे, उमेश इंगळे, राजेश इंगळे व गोवर्धन इंगळे यांच्याविरुद्ध कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील करीत आहेत.  
लग्नावर आलं विघ्न!
या गंभीर घटनेमुळे आरोपीच्या घरासमोर असलेल्या इंगळे कुटुंबीयांच्या लग्नावर विघ्न आले. अभिमन्यू इंगळे यांचा मुलगा धीरज याचा मंगल परिणय १0 मार्चला असल्यामुळे ९ मार्चच्या रात्री मेहंदी व हळद लावण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. घरासमोर मंडपही टाकण्यात आला होता. थाटात होणार्‍या लग्नसोहळ्य़ाला या घटनेमुळे पूर्णविराम देऊन, अखेर गाजावाजा न करता साध्या पद्घतीने बुद्ध विहारात हा विवाह सोहळा संपन्न झाला.

Web Title: Youth attack in Chowgaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.