कोंबडीच्या वादातून युवकास मारहाण; तरुणीचा विनयभंग; खदान पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By आशीष गावंडे | Published: February 8, 2024 08:03 PM2024-02-08T20:03:38+5:302024-02-08T20:03:46+5:30
खदान पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अकोला: दुचाकीच्या धडकेत काेंबडी मेल्याच्या कारणावरुन एका युवकाला मारहाण करुन दुचाकीवर बसलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना खदान पाेलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरुन मारहाण करणाऱ्या दाेन जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खदान पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील एका परिसरातून फिर्यादी तरुणी व माेहन वाघाडे दुचाकीने जात हाेते. यादरम्यान, अनिल पवार याच्या घरासमोरून जात असताना दुचाकीचालक वाघाडे यास थांबवून रघु पवार याने तुझ्या दुचाकीमुळे माझी कोंबडी मरण पावली आहे, असे म्हणत शाब्दीक वाद घालून मारहाण केली. तसेच फिर्यादीचा वाइट उद्देशातून हात धरत डोक्याचे केस ओढून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मारहाण करणाऱ्यांनी तेथे पडलेल्या लाकडी काठीने दुचाकीचालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत दुचाकीस्वार जखमी झाला आहे. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून अनिल पवार व रघु पवार याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३२३, ३५४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक नीता दामधर करीत आहेत.