अकोल्यात किडनी तस्करीतून युवकाने केली आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 03:44 AM2019-09-18T03:44:59+5:302019-09-18T03:45:03+5:30
बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली.
अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या युवकाने पुणे येथील डेव्हीड नामक एका डॉक्टरच्या किडनी तस्करी प्रकरणाच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचे मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याने खळबळ उडाली आहे.
अतुल अजाबराव मोहोड पुणे येथे टायर कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी तो आळंदा येथे आला होता. त्यानंतर मंगळवारी तो पुन्हा पुणे येथे जाणार होता; मात्र सोमवारी रात्रीपासूनच तो घरून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्याचा मृतदेह शेतातील आंब्याच्या झाडाजवळ आढळून आला. त्याने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पुण्यातील डेव्हीड नामक डॉक्टरचा उल्लेख केला आहे. ‘हा डॉक्टर गोरगरीब लोकांच्या किडनी काढून त्या विदेशात विकतो, त्याच्या या प्रकरणात मला गोवण्यात आले होते. याच कारणामुळे मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही’ असेही चिठ्ठीत नमूद आहे. बार्शीटाकळी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मोबाइलवर तस्करीचे मेसेज
आत्महत्या केलेल्या अतुलच्या मोबाइलमध्ये डेव्हीड नामक डॉक्टरचे किडनी तस्करी संदर्भात मेसेजेस असल्याची माहिती सूत्रांनी दिली.