शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी युवक काँग्रेसची किसान संघर्ष यात्रा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2017 02:32 AM2017-06-11T02:32:03+5:302017-06-11T02:32:03+5:30
युवक काँग्रेसच्यावतीने सोमवार, १२ जूनपासून अकोला लोकसभा मतदारसंघात युवा किसान संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसह शेतकर्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवार, १२ जूनपासून अकोला लोकसभा मतदारसंघात युवा किसान संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेत शेतकर्यांसोबत संवाद साधून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे अकोला लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष अँड. महेश गणगणे यांनी शनिवारी दिली.
शहरातील स्वराज्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने राज्यात ६ ते १५ जून या कालावधीत युवा किसान संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये १२, १३ व १४ जून रोजी अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर, रिसोड व मालेगाव इत्यादी तालुक्यांत किसान संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, कृषी पंपांचे वीज देयक माफ करण्यात यावे, खरीप हंगामात शेतकर्यांना मोफत बियाणे व खतांचे वाटप करण्यात यावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यात यावा व जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी युवा किसान संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. या संघर्ष यात्रेत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकर्यांसोबत संवाद साधून जनजागृती करणार आहेत, असेही अँड. महेश गणगणे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक पराग कांबळे, माजी नगरसेवक कपिल रावदेव, गणेश कळसकर, विशाल इंगळे, राहुल थोटांगे, चेतन कोंडाणे, अंशुमन देशमुख, कशिशखान, सै.शहजाद, कलीमभाई, सागर तेलगोटे, मो. शारीक, राजकुमार शिरसाट उपस्थित होते.
"एसटी" बसद्वारे यात्रा!
युवा किसान संघर्ष यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तीन दिवस राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसद्वारे प्रवास करून शेतकर्यांशी संवाद साधतील आणि शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर जनजागृती करण्यात येणार असल्याचेही अँड. गणगणे यांनी यावेळी सांगितले.