पोहणे जीवावर बेतले; शहापूर धरणात युवक बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:48 PM2019-08-12T17:48:19+5:302019-08-12T17:48:25+5:30
वडाळी देशमुख येथील शूभम फुकट हा युवक आपल्या मित्रांबरोबर सोमवारी शहापूर धरणात पोहण्यासाठी गेला होता.
वडाळी देशमुख (अकोला): पणज ते वडाळी देशमुख रस्त्यावर असलेल्या शहापूर धरणात २५ वर्षीय युवक बुडाल्याची घटना १२ आॅगस्ट रोजी घडली. शूभम उर्फ गोलू अजाबराव फुकट रा. वडाळी देशमुख असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
वडाळी देशमुख येथील शूभम फुकट हा युवक आपल्या मित्रांबरोबर सोमवारी शहापूर धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याचे कपडे आणि बुट धरणाच्या काठावर होते.घटनेची माहिती मिळताच वडाळी देशमुखचे पोलीस पाटील यांनी धरण गाठून पोलिसांना माहिती दिली. परिसरात दोन ते तीन दिवसांपूर्वी जोरदार पाउस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आले होते. त्यामुळे, पणज ते वडाळी देशमुख रस्त्यावर असलेल्या शहापूर धरणातही मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आहे. या धरणाचे बांधकाम झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे, धरण पाहण्यासाठी दररोज परिसरातील ग्रामस्थ गर्दी करतात. धरण परिसरात सुरक्षीतेसाठी उपाय योजना करण्याची गरज आहे.