युवा महोत्सवात तरुणाईचा जल्लोष!
By admin | Published: September 27, 2016 02:51 AM2016-09-27T02:51:05+5:302016-09-27T02:51:05+5:30
डॉ. पंदेकृवि युवा महोत्सवास प्रारंभ; २0 महाविद्यालये, २५0 विद्यार्थ्यांंचा सहभाग.
अकोला, दि. २६- महाविद्यालयीन युवक, युवतींच्या सुप्त गुणांना वाव देत, शिक्षणासोबतच सर्वांंंगीण विकास साध्य करण्याच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांंंच्या कला- गुणांना वाव देणार्या रंगारंग युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी तरुणाईने जल्लोष केला. तीन दिवस चालणार्या या महोत्सवात २0 महाविद्यालयातील २५0 विद्यार्थ्यांंंनी सहभाग घेतला आहे.
२६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवसीय युवा महोत्सवाची रंगारंग सुरुवात कृषी महाविद्यालयाच्या स्व. डॉ . के. आर. ठाकरे सभागृहात संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही. एम. भाले यांच्या शुभहस्ते झाली. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.एस. माने यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी संजय कोकाटे, युवा महोत्सवाचे संयोजक डॉ. एस. के. अहेरकर, कृ. म. वि. जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पी. बी. उमाळे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांंंनी अभ्यासासोबतच आपल्या अंगभूत कला-गुणांचा आविष्कार घडविण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन डॉ. भाले यांनी या प्रसंगी केले तर स्पर्धेमधील नियम, अटी आणि शिस्त यावर विद्यार्थी कल्याण अधिकारी संजय कोकाटे यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. माने यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या सहभागाची नोंद घेऊन आंतर विद्यापीठीय स्पर्धेकरिता सिद्ध होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ श्रीकांत अहेरकर यांनी तर संचालन डॉ. राजेश शेळके यांनी केले. डॉ. संदीप लांबे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
अशा होतील स्पर्धा
या युवा महोत्सवाकरिता विद्यापीठा अंतर्गत एकूण २0 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला असून जवळपास २५0 विद्यार्थी, विद्यार्थिनी आपले कला गुण प्रदर्शित करणार आहेत. यामध्ये गीत गायन, नाटक, देशभक्तीपर गीत, चित्रकला, रांगोळी, पोस्टर, क्ल्ये मोडेलिंग, आदींसह माईम, नृत्य, एकपात्री अभिनव प्रयोग, मिमिक्री, नाटक, इत्यादींसह बौद्धिक खाद्य पुरविणारी वादविवाद स्पर्धा, उत्स्फूर्त भाषणे, कविता, रिसायटेशन आदी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांंंनी कृषी महाविद्यालायाचा परिसर बहरून गेला असून आपली कौशल्ये, कसब दाखविण्यासाठी विद्यार्थी सरसावले आहेत.