पाच हजार रुपयांची खंडणी मागणारा युवक गजाआड
By admin | Published: December 30, 2014 01:12 AM2014-12-30T01:12:16+5:302014-12-30T01:12:16+5:30
युवकास गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी.
अकोला: आंबेडकरनगरात राहणारा भज्जन रमेश तायडे याने जबरदस्तीने पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि खंडणी न दिल्यामुळे संतप्त होऊन तक्रारदाराचे कार्यालय पेटवून दिले. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी सोमवारी दुपारी आरोपी भज्जन तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कैलास टेकडीतील समतानगरात राहणारा मंगेश दिगंबर अहिर (३0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते महसूल कॉलनीमधील महसूल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या उत्कर्ष इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीचे शाखा प्रबंधक आहेत. ११ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान आंबेडकर नगरात राहणारा भज्जन रमेश तायडे हा त्याच्या काही सहकार्यांना घेऊन कंपनीच्या कार्यालयात गेला आणि या ठिकाणी त्याने मंगेश अहिर यांच्याकडे श्रामणेर शिबिरासाठी देणगीची मागणी केली. अहिर यांनी ५00 रुपये देण्याची तयारी दाखवली. तथापि, भज्जनने ही रक्कम घेण्यास नकार देत, त्यांना पाच हजार रुपयांची मागणी केली. ही मागणी अहिर यांनी फेटाळून लावल्याने संतप्त झालेल्या भज्जनने त्यांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी देण्यासोबतच कार्यालय जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर रविवारी अहिर यांच्या कार्यालयाला अचानक आग लागली. आगीत त्यांचे कार्यालय जळून खाक झाले. त्यामध्ये दोन लाख रुपयांचे साहित्य जळाले. सिव्हिल लाइन पोलिसांनी भज्जनविरुद्ध भादंविचे कलम ३८५, ४३६ नुसार गुन्हा दाखल केला.