किरकोळ वादातून युवकाची हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:13 PM2020-01-04T12:13:22+5:302020-01-04T12:13:28+5:30
राजेश पानझाडे हा मद्यपी होता. त्याचा काही आरोपींसोबत किरकोळ वाद झाला. या वादातूनच आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अकोला: किरकोळ वादातून अज्ञात आरोपींनी एका मद्यधुंद युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास आरपीटीएस रोडवरील कब्रस्थानजवळ घडली. पोलिसांनी युवकाला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
डाबकी रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कपाले यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री उशिरा माहिती मिळाली की, एक व्यक्ती जखमी अवस्थेत आरपीटीएस रोडवरील कब्रस्थानजवळ पडून आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर जाऊन त्या जखमी व्यक्तीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना त्याचे नाव राजेश जानराव पानझाडे (मूळ राहणार खेल देशपांडे, ह. मु. फडके नगर) असल्याचे समजले. पोलिसांनी अधिक विचारपूस करण्याचा प्रयत्न केला; परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राजेश पानझाडे हा मद्यपी होता. त्याचा काही आरोपींसोबत किरकोळ वाद झाला. या वादातूनच आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच अनैतिक संबंधातून त्याच्यावर अज्ञात आरोपींनी हल्ला केल्याची चर्चा असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी राजेश पानझाडे याच्या घरातून एक डायरी जप्त केली असून, त्यात काही नावे असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्यासह डाबकी रोडचे ठाणेदार विजय नाफडे यांनी भेट दिली. मृतकावर त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.