‘व्हॅलेंटाईन वीक’साठी ‘तरुणाई’ सज्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:17+5:302021-02-07T04:17:17+5:30
रवी दामोदर अकोला : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ ...
रवी दामोदर
अकोला : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होतो. ‘व्हॅलेंटाईन डे’साठी अजून एक आठवडा शिल्लक असला, तरी वातावरण निर्मितीसाठी ‘व्हॅलेेंटाईन वीक’ ही संकल्पना जन्माला आली आहे. या प्रेमाच्या उत्सवाची सुरुवात रविवारपासून होत आहे. रविवार, ७ फेब्रुवारी हा ‘रोझ डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगांचे गुलाब दाखल झाले आहेत. ‘व्हॅलेंटाईन वीक’च्या पृष्ठभूमीवर गुलाबाचे दर दुपटीने वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर फूल उत्पादक शेतकऱ्यांसह फूल विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रेमाच्या या उत्सवात फूल व्यवसायाला उभारी मिळण्याचे चित्र दिसून येत आहे. ‘व्हॅलेंटाईन वीक’चा पहिला मान प्रेमाचा सुंगध परविणाऱ्या गुलाबाला आहे. शनिवार, ७ फेब्रुवारी हा रोझ डे म्हणून साजरा होणार असून, यासाठी फुलांची बाजारपेठ सजली आहे. पुणे, अमरावती, बंगळूर येथून फुलांचा राजा ‘गुलाब’ जिल्ह्यातील बाजारपेठेत दाखल झाला आहे; मात्र गुलाब खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. गत आठवड्यात १० प्रती नगाने विक्री होत असलेल्या गुलाबाचे दर दुपटीने वाढून शनिवारी २० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढलेले दर हे २० फेब्रुवारीपर्यंत स्थिर राहणार असल्याचे एका फूलविक्रेत्याने सांगितले. ‘व्हॅलेंटाईन वीक’साठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आहे.
---------------------------------------
व्हॅलेंटाईन वीक
७ फेब्रुवारी - रोझ डे
८ फेब्रुवारी - प्रपोज डे
९ फेब्रुवारी - चॉकलेट डे
१० फेब्रुवारी - टेडी डे
११ फेब्रुवारी- प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी - किस डे
१३ फेब्रुवारी - हग डे
१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे