राजकारणात युवकांचा पुढाकार हवा
By admin | Published: October 9, 2014 01:07 AM2014-10-09T01:07:55+5:302014-10-09T01:07:55+5:30
अकोला लोकमत परिचर्चा; विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर युवकांनी केल्या अपेक्षा व्यक्त.
अकोला : राजकारणाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगला नाही. राजकारणाला बदनाम करण्याचे काम काही मूठभर लोकांनी केले. राजकारणाचे स्वरूप बदलण्यासाठी युवकांनी आता राजकारणात उतरले पाहिजे. युवकांनी राजकारण हातात घेतल्याशिवाय राजकारणाचे शुद्धीकरण होणार नाही, असे मत विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेत युवकांनी व्यक्त केले.
बुधवारी लोकमत कार्यालयात ह्यराजकारण आणि युवकह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत उपमहापौर व युवा सेनेचे पदाधिकारी विनोद मापारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष बुढन गाडेकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हर्षवर्धन देशपांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अविनाश चव्हाण, शंकरलाल खंडेलवाल विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी राजदीप टोहरे, विराट ग्रुपचे अध्यक्ष कुणाल शिंदे व मास्टर पॉवर जीमचे संचालक मनोज पाटील यांनी सहभाग घेतला. सर्वच वक्त्यांनी राजकारणात बदल घडवून आणण्याची क्षमता युवकांमध्येच असून, त्यासाठी अधिकाधिक युवकांनी राजकारणात आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. आज निवडणुका आल्या की युवकांना भुलविण्याचे काम केले जाते. युवकांचा उपयोग गर्दी वाढविण्यासाठी केला जातो. उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात युवकांचा वापर केला जातो. युवकाला आपल्याकडे वळविण्यासाठी त्याला विविध प्रलोभने दिली जातात; परंतु निवडणूक झाल्यावर तोच युवक बेरोजगार म्हणून चौकात पानटपरीवर रिकामी कामे करीत असतो. यातूनच गुन्हेगारी बळावते. आपल्या जाहीरनाम्यात युवकांसाठी रोजगाराची आश्वासने देणारे पक्ष निवडून आल्यावर युवकांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप या युवकांनी केला. राजकारणाचे स्वरूप बदलण्यासाठी युवकांनी राजकारणात यावे, अशी अपेक्षा या युवकांनी व्यक्त केली.