लग्न तुटल्यामुळे युवकाने धमकावले; युवतीची आत्महत्या
By admin | Published: July 12, 2017 01:24 AM2017-07-12T01:24:54+5:302017-07-12T01:24:54+5:30
दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल: आरोपीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: लग्न तुटल्यामुळे युवकाने धमकावल्यामुळे पूर्वाश्रमीची प्रेयसी असलेल्या युवतीने आत्महत्या केल्याची घटना १५ मे रोजी घडली होती. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी तपासाअंती दोन महिन्यानंतर युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भौरद येथील अनंता भगवान गावंडे याचे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे राहणाऱ्या एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने युवतीला लग्नाचे आमिषसुद्धा दाखविले होते. दरम्यान, युवकाचे लग्न जुळले. लग्नाची तयारी झाली; परंतु अनंताच्या प्रेमसंबंधाची माहिती झाल्यामुळे मुलीकडच्या नातेवाइकांनी लग्न मोडले. ठरलेले लग्न आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीमुळेच तुटले, असा संशय अनंता गावंडे याला आला. त्याने प्रेयसीला फोन करून जाब विचारला आणि तिला धमकावले. तिने त्याला आपण सांगितले नसल्याचे सांगत, समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु अनंताने तिच्यावर आरोप केल्यामुळे युवतीने १५ मे २0१७ रोजी आत्महत्या केली.
याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला. तपासाअंती अनंता गावंडे याने दिलेल्या धमकीमुळे युवतीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने, डाबकी रोड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी भादंवि कलम ३0६ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील करीत आहेत.