चोहट्टाबाजार पोलीस चौकी समोर ठाणेदाराने युवकाला चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:24 AM2021-03-31T10:24:39+5:302021-03-31T10:24:48+5:30
A youth was beaten by a police दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी एका युवकाला चांगलाच चोप दिल्याची घटना २९ मार्च रोजी चोहट्टाबाजार पोलीस चौकीसमोर घडली.
अकोटःअकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी एका युवकाला चांगलाच चोप दिल्याची घटना २९ मार्च रोजी चोहट्टाबाजार पोलीस चौकीसमोर घडली. दरम्यान या घटनेच्या अनुषंगाने दहीहांडा पोलिसांनी तीन फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले आहेत. तर या घटनेतील युवकाने आपण फिर्याद देण्यासाठी गेलो असता नाहक मारहाण केल्याचा आरोप केला.
दहीहंडा पोलीस स्टेशनचे चोहट्टाबाजार येथे अकोट येथील एम एच २७ बीई ४५७४ क्रमांकाचे मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीला दुचाकीने धडक दिली. ही माहिती गाडीचे मालक चेतन धनराज भोयर यांना गाडी चालकाने दिली. त्यामुळे भोयर हे स्वतः चोहट्टाबाजार चौकीमध्ये आले असता रिपोर्ट कशासाठी देतो तुझा रिपोर्ट घेत नाही या कारणावरुन वाद घालत शिवीगाळ करीत ठाणेदार प्रकाश अहिरे व बीट जमादार भटकर यांनी मारहाण केल्याचे भोयर यांनी म्हटले आहे. या सर्व घटनेत पोलिसांनी तीन फिर्याद दाखल करुन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये
भोयर यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीला धक्का मारुन चालकास शिवीगाळ केल्याच्या चालक अभिजित घुले यांच्या फिर्यादीवरुन अकोला येथील सौरभ उत्तम सुरळकर यांच्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला. तर अकोला येथील युवकांचे फिर्यादीवरुन अभिजित घुले यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हा दाखल केला. तर दहीहांडा पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करीत परस्पर विरोधी तक्रार दाखल करणारे लोकांनी गोंधळ घातल्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची पोलिसांची माहिती आहे.
काल घडलेल्या अपघात प्रकरणावरुन परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल केले. तसेच पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल करीत गोंधळ घालणारे दोन्ही पार्टीतील आठ लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. आरोपींना आमच्या ताब्यात द्या यावरून पोलीस चौकीमध्ये गोंधळ घातला. शेवटी पोलिसांवर अरेरावी करीत असल्याने कायदा व सुव्यवस्था दृष्टीने अवाजवी बळाचा वापर करणे गरजेचे होते.
- प्रकाश अहिरे, ठाणेदार पोलीस स्टेशन दहीहांडा