नदीच्या पुरात युवक वाहून गेला
By admin | Published: June 28, 2016 01:48 AM2016-06-28T01:48:36+5:302016-06-28T01:48:36+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील बेंबळा नदीला आलेल्या पुरात युवक व दोन बैलजोड्याही वाहून गेल्या.
खामगाव : जळगाव जामोद तालुक्यातील बेंबळा नदीला आलेल्या पुरात जामोद येथील ३0 वर्षीय युवक वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. तालुक्यातील ग्राम खेर्डा बु. येथील शेतकरी रामदास राऊत व अवचित क्षीरसागर हे बैलजोडी घेऊन शेतातून घरी परतत असताना खेर्डा आणि चांगेफळ नाल्याला आलेल्या पुरामध्ये दोघांच्याही बैलजोड्या वाहून गेल्या. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. जळगाव जामोद तालुक्यासह संग्रामपूर परिसरात बेंबळा नदीच्या पुलावर उभा असलेला वसंत रमेश बोबडे हा युवक पुलावर अचानक पाणी वाढल्याने नदीत वाहून गेला. चांगेफळ व त्यानंतर चोंडी या परिसरात युवकाचा शोध घेण्यात आला. मात्र उशिरापर्यंंंंत या युवकाचा पत्ता लागला नाही. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा आणि चांगेफळ नाल्याला आलेल्या पुरात रामदास राऊत यांची बैलगाडी, दोन्ही बैल व शेतीपयोगी साहित्य वाहून गेले तर त्याच नाल्याच्या पुरात अवचित क्षीरसागर यांचेही दोन बैल वाहून गेले आहेत. दरम्यान यापैकी एक बैल सापडला आहे. अकोला जिल्ह्यात बैलगाडी व बैल वाहून गेला अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील खरबडी येथील नाल्याला आलेल्या पुरात सुखदेव बळीराम खरबडकार यांची बैलगाडी व एक बैल वाहून गेला.