पेट्रोल पंपवर काम करणारा आशुतोष शिकवितो प्राचीन युद्धकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 03:58 PM2019-05-19T15:58:21+5:302019-05-19T15:58:34+5:30
ध्येयवेडा तरुण आशुतोष विवेक चव्हाण स्वत: तर या कलेत पारंगत झालाच; पण आपल्यासारख्या अनेक युवकांना ही कला आत्मसात करण्यासाठी सदैव प्रेरित करीत असतो.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: भारतीय युद्धकला ही आत्मरक्षा, प्रतिस्पर्धीवर मात करणे, शरीर स्वास्थ्य, मानसिक व आध्यात्मिक विकासाकरिता अवगत केली जाते. पूर्वी प्रत्येक नागरिक युद्धकलेत पारंगत नसला तरी स्वरक्षणासाठी ही कला अवगत करीत असत. आज मात्र ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे; परंतु अकोल्यातील खडकी परिसरात राहणारा ध्येयवेडा तरुण आशुतोष विवेक चव्हाण स्वत: तर या कलेत पारंगत झालाच; पण आपल्यासारख्या अनेक युवकांना ही कला आत्मसात करण्यासाठी सदैव प्रेरित करीत असतो. आशुतोषने रात्रपाळीत पेट्रोल पंपवर काम करू नही आतापर्यंत जवळपास ५५० मुला-मुलींना युद्धकलेत पारंगत केले आहे.
आशुतोषने पेट्रोल पंपवर काम करीत मुक्त विद्यापीठातून बारावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने कराटेमध्ये ब्लॅक बेल्टही प्राप्त केला आहे; परंतु लहानपणापासून शिवचरित्रातील प्रत्येक व्यक्तिमत्त्व आकर्षिक करीत असल्याने युद्धकला शिकण्याचे त्याला वेड लागले. या वेडापायी त्याने मुंबई गाठली. मुंबई येथे चार वर्षे नोकरी करीत दोन वर्षे ठाण्यातील छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अमित गडाकुश यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. युद्धकलेत आपल्या परिसरातील युवकांना प्रशिक्षित करावे, हाच विचार घेऊन अकोल्याला परतला. अकोल्यात शिव प्रतिष्ठान प्राचीन युद्धकला केंद्र सुरू करू न ८ ते २२ वर्षांतील मुले व मुलींना प्रशिक्षण देणे सुरू केले. आतापर्यंत जवळपास ५५० खेळाडूंना आशुतोषने युद्धकलेचे प्रशिक्षण दिले.
रात्री पेट्रोल पंपवर नोकरी, सकाळी एका खासगी शाळेत नोकरी, सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देणे असा आशुतोषचा दिनक्रम. यासोबत पोलीस बॉइज असोसिएशनचे कार्य. शिव प्रतिष्ठानला जेवढाही प्रशिक्षणाचा किंवा शस्त्रांचा तो सर्व खर्च आशुतोष स्वत:च करतो. दोन्ही नोकरी करू न जेवढाही पैसा मिळतो, तेवढा शिवकालीन प्राचीन युद्धकलेच्या प्रचार व प्रसारासाठी करतो. लोकप्रतिनिधी किंवा दानशूर व्यक्ती यांच्याकडूनदेखील कधीच मदत घेतली नाही. शिव प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी मुलींना व महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. खेडे गावामध्ये जाऊन दोन महिन्यांचे नि:शुल्क प्रशिक्षण, दरवर्षी उन्हाळ्यात महापुरुषांचे स्मारकांची साफसफाई करणे, मलकापुरातील अनाथ आश्रमातील मुलींना दोन वर्षांपासून नि:शुल्क प्रशिक्षण, रक्तदान शिबिर, योग प्रशिक्षण शिबिर, मुलांकरिता नि:शुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, शहीद जवानांना आदरांजली कार्यक्रमांचे आयोजन आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आशुतोषने सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २४ पदके
गोवा येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बीच कॉम्बेट गेम्स २०१९ (समुद्रतटीय युद्ध) स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंनी आशुतोषच्या मार्गदर्शनात २४ पदके मिळविली. सातवी राज्यस्तरीय शिवकालीन दांडपट्टा स्पर्धा, तेरावी राष्ट्रीय आष्टेडू आखाडा स्पर्धेतही एकूण २७ पदके प्राप्त केली. जिल्हास्तरीय स्पर्धेत ६७ आणि विभागीय स्पर्धेत ५२ पदकांची कमाई केली.
महिला व मुलींना मोफत प्रशिक्षण
शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला व मुलींना नेहमीकरिताच आशुतोषने मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. पुरुषांप्रमाणेच महिलादेखील स्वरक्षणासाठी सक्षम असावी, असे आशुतोषला वाटते. यासाठी लाठीकाठी, तलवारबाजी, भाला, दांडपट्ट्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
चित्तथरारक प्रात्यक्षिक
शिवजयंती, संभाजी जयंतीनिमित्त शहरातून निघत असलेल्या शोभायात्रेत आशुतोष व त्याचे विद्यार्थी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करू न युद्धकलेचा प्रचार करतात. प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ तयार करू न समाजमाध्यमाद्वारे प्रसार करतात.
युद्धकला प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी अनेक समस्यांना समोरे जावे लागते. आर्थिकदृष्ट्या फार खर्चिक आहे. ही कला टिकविण्यासाठी लोकप्रतिनिधी व दानशूर व्यक्तींना समोर येऊन मदत केली पाहिजे
- आशुतोष चव्हाण, युद्धकला प्रशिक्षक