विषारी द्रव्यामुळे युवकाचा मृत्यू
By admin | Published: June 7, 2017 01:14 AM2017-06-07T01:14:45+5:302017-06-07T01:14:45+5:30
वैद्यकीय अहवालात कारण स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोट फैल येथील रहिवासी तथा सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू विषारी द्रव्यामुळे झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे; मात्र या युवकाने विष प्राशन केले की त्याला जबरदस्तीने पाजण्यात आले. या प्रकाराची पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.
अकोट फैलमधील रहिवासी कुणाल दीपक सांगळे यास एका महिलेने काही दिवसांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शनिवारी रात्री युवकास विष पाजले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर युवकाच्या नातेवाइकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून मुलाचा खून केल्याचा आरोप केला. त्यानंतर याच आशयाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आली.
सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सदर महिलेस सोमवारी ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी करण्यात येत असून, अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे; मात्र याच महिलेने युवकाचा खून केला की नाही, यासंदर्भात पोलीस माहिती घेत आहे.
महिलेचे नोंदविले बयान
अकोट फैलातील रहिवासी विधवा महिलेशी कुणालचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिचे मंगळवारी बयान नोंदविण्यात आले आहे. युवकास विष पाजले की त्याने प्राशन केले, या प्रकाराचा सिटी कोतवाली पोलीस लवकरच पर्दाफाश करणार असल्याची माहिती आहे.