विकासपर्वासाठी युवकांचे स्वाक्षरी अभियान
By admin | Published: December 7, 2015 02:35 AM2015-12-07T02:35:38+5:302015-12-07T02:35:38+5:30
‘प्रोटेस्ट फॉर अकोला’चा अभिनव उपक्रम.
अकोला: अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांच्या गर्दीत हरविलेल्या अकोला शहराचे विकासपर्व सुरू झाले आहे. ते अखंडित सुरू राहिल्यास शहर विकासाचा संकल्प नक्कीच पूर्णत्वास जाईल, या जाणिवेने 'प्रोटेस्ट फॉर अकोला' या अकोल्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंंनी स्थापन केलेल्या संस्थेच्या वतीने रविवार, ६ डिसेंबर रोजी सिव्हिल लाइन चौकात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले.
ठिकठिकाणी वाढलेले अतिक्रमण, अरुंद रस्ते आणि भकास पडलेल्या बाग-बगिच्यांमुळे गेल्या अनेक वर्षांंंपासून अकोला शहराचा विकास खुंटला होता. पाणीपुरवठा करणारी पुरातन जलव्यवस्था, अनधिकृत बांधकामे अशा विविध कारणांमुळे बकाल स्वरूप प्राप्त झालेल्या या शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. शहर विकासाच्या दृष्टिकोनातून सुरू झालेले हे पर्व अखंडित सुरू रहावे, याकरिता 'प्रोटेस्ट फॉर अकोला' या संस्थेच्या वतीने रविवारी सकाळी ९.३0 ते दुपारी ३ या वेळेत सिव्हिल लाइन चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत स्वाक्षरी करणार्या नागरिकांच्या हातावर संस्थेच्या वतीने 'वी सपोर्ट डेव्हल्पमेंट' असे शिक्के मारण्यात आले.
शहर विकासाचे उद्दिष्ट पूर्णत्वास जावे, त्यास अकोलेकरांनी पाठिंबा दर्शवावा, याकरिता राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी अभियानाच्या यशस्वितेसाठी संस्थाध्यक्ष अनुराग झुनझुनवाला, सचिव शिवा हिंगणे, आशिष कसले, गिरीष आखरे, सतीश तावरे, विकास चौधरी, रिषी झुनझुनवाला, मंगेश पुंडकर, अभिषेक अग्रवाल, प्रतीक कथले, नैर्ऋत्य खोसला, भूषण टाले, अमोल भिसे, सुनील झुनझुनवाला, निखिल ठाकरे, नीलेश काकड, सागर कावरे, राजदीप टोहरे, दिलीप छावछरिया, अँड. सुमीत बजाज, रितेश चौधरी, गौरव अग्रवाल, मोहित झुनझुनवाला, डॉ. गजानन कुळकर्णी आदींनी परिश्रम
घेतले.