युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात; बाळापूर शहरात होणार सभा
By आशीष गावंडे | Published: November 4, 2022 07:09 PM2022-11-04T19:09:27+5:302022-11-04T19:09:49+5:30
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोला दौऱ्यावर असून तिथे ते जाहीर सभा घेणार आहेत.
अकोला: महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यात ठिकठिकाणी ‘संवाद यात्रे’च्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. येत्या ७ नोव्हेंबर रोजी ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बाळापूर शहरात त्यांची सभा पार पडणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्ह्यात बैठकांचा धडका लावला आहे.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकारला उण्यापुऱ्या अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तोच, एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावत भाजपसोबत घरोबा केला. आघाडी सरकार कोसळल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर प्रहार करण्यासाठी राज्यात ‘संवाद यात्रे’ला प्रारंभ केला. येत्या ७ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बाळापूर शहरात ते जाहीर सभेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
शिवनी विमानळावर आगमन
सोमवारी सकाळी ९ वाजता आदित्य ठाकरे यांचे शिवनी विमानतळावर आगमन होणार आहे. याठिकाणी शिवसैनिकांसोबत हितगूज साधल्यानंतर ते कडेकोट पोलीस बंदोबस्तात बाळापूरकडे रवाना होतील. राज्यातील सत्तातरानंतर युवासेना प्रमुख पहिल्यांदा जिल्ह्यात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बाळापूर शहरात ते सभेच्या माध्यमातून संवाद साधतील. असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.