अकाेलेकरांसाठी झाेननिहाय काेराेना चाचणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:09+5:302021-03-14T04:18:09+5:30
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यासह शहरातील जीवनमान पुन्हा एकदा प्रभावित झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काराेनाचा आलेख घसरल्याचे चित्र हाेते. ...
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यासह शहरातील जीवनमान पुन्हा एकदा प्रभावित झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काराेनाचा आलेख घसरल्याचे चित्र हाेते. जानेवारीच्या अखेरीस पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेता शासन सतर्क झाले. राज्यात विदर्भातून अकाेला, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाने डाेके वर काढल्याचे समाेर येताच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समाेर आले आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी काेराेना चाचणी वाढविण्यासाठी झाेननिहाय चाचणी केंद्र सुरू करण्याचे निर्देश शनिवारी वैद्यकीय आराेग्य यंत्रणेला दिले.
या ठिकाणी होईल चाचणी
काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार पूर्व झोन अंतर्गत कृषी नगर येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र.२२, पश्चिम झोनमधील हरिहरपेठ येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र.१९, उत्तर झोनमध्ये सिटी कोतवालीलगतच्या मनपा हिंदी मुलांची शाळा क्र.१ तसेच दक्षिण झोनमध्ये आदर्श कॉलनी येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र. १६ येथे चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी सकाळी १० ते २ या कालावधीत चाचणी करता येणार आहे.
भरतिया, कस्तुरबामध्ये लसीकरण
मनपाच्या भरतिया व कस्तुरबा गांधी रुग्णालयात काेराेना चाचणी करण्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला हाेता. आयुक्त निमा अराेरा यांनी उपराेक्त दाेन्ही रुग्णालयात हाेणारी काेराेना चाचणी बंद करीत या ठिकाणी केवळ लसीकरण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. आयुक्तांच्या या निर्णायामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असून या ठिकाणी हाेणारी गर्दी टाळता येणार आहे.