पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात उपाययोजना शून्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:37 PM2019-12-09T12:37:39+5:302019-12-09T12:37:45+5:30
पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासंदर्भात आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, त्यामध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना शून्य दर्शविण्यात आल्या आहेत. पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील धरणे, नद्या, विहिरी व तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीटंचाईची परिस्थिती नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.
यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला. पावसाळा संपल्यानंतर गत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला असून, नदी-नाले वाहत आहेत, तसेच विहिरी आणि तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही भागात पाणीटंचाईची परिस्थिती नसल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा गत ३० नोव्हेंबर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या या कृती आराखड्यात पाणीटंचाई निवारणाची एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.
आराखडा तयार करण्याचे निर्देश!
दुसºया टप्प्यात जानेवारी ते मार्च आणि तिसºया टप्प्यात एप्रिल ते जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेला देण्यात आले. त्यानुसार दुसºया व तिसºया टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात येणार आहे.