जिल्ह्यात सातपैकी सहा केंद्रांवर हरभरा खरेदी शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:04+5:302021-03-14T04:18:04+5:30
अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार २०२०-२०२१ या वर्षासाठी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले ...
अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार २०२०-२०२१ या वर्षासाठी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात केंद्रांवर २०४ शेतकऱ्यांकडून ३७८७.५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र, बाजार समितीत हरभऱ्याला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील सातपैकी सहा केंद्रांवर हरभऱ्याची खरेदीच झालेली नाही.
निसर्गाने साथ दिल्याने हरभरा पीक चांगले आले. कष्टाने पिकवलेल्या मालाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. यावर्षी शासनाने आधारभूत किमतीनुसार हरभरा खरेदीसाठी ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये आतापर्यंत ५ हजार ६४४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. यापैकी केवळ ४६५ शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले आहेत. मात्र, आधारभूत किमतीपेक्षा बाजार समितीत चांगला दर मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी तेथे माल विकण्यास पसंती दिली आहे. तुरीप्रमाणे हरभरा खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ७८७.५० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली. विशेष म्हणजे ही खरेदी पारस येथील एकमेव केंद्रावर झाली आहे. उर्वरित बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, विवरा, तेल्हारा बाजार समिती, थार एमआयडीसी तेल्हारा या सहा केंद्रांवर हरभरा उत्पादक शेतकरी फिरकलेच नाहीत. सामान्यपणे नवीन मालाची आवक सुरू झाल्यानंतर दर काही प्रमाणात तुटतात. मात्र, यंदा आवक सुरू होऊनही दर वाढतच आहे. त्यामुळे यंदा हरभराही चांगला भाव खाणार असल्याचे दिसून येते.
--बॉक्स--
अशी आहेत केंद्र
७ केंद्र
असा आहे दर
५,१०० रुपये प्रतिक्विंटल
इतकी झाली खरेदी
३७८७.५० क्विंटल
एवढ्या रुपयांची झाली खरेदी
१ कोटी ९३ लाख १६ हजार २५०
--बॉक्स--
तीन केंद्रांवर एकालाही एसएमएस नाही
बाळापूर, पातूर, विवरा या तिन्ही केंद्रांवरुन एकाही शेतकऱ्याला एसएमएस पाठविण्यात आला नाही. बार्शीटाकळी केंद्रावरुन केवळ तीन शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आला आहे.