अकोल्यात २३ मे रोजी शून्य सावली दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 12:56 PM2022-05-09T12:56:02+5:302022-05-09T12:56:09+5:30
Zero shadow day on 23rd May in Akola : २३ मे राेजी अकोलेकरांना शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
अकोला : मे महिन्यात राज्यातील विविध शहरांमध्ये शून्य सावली दिवस राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे. त्यानुसार २३ मे राेजी अकोलेकरांना शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातील हे दोन दिवस शून्य सावलीचे असतात. ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यातील कोनिय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा असे वर्षातून दोन दिवस शून्य सावली दिनाचे येत असल्याचे खगोल अभ्यासक सांगतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. दुपारी १२.०० ते १२.३५ या दरम्यान सूर्य निरीक्षण केल्यास अकोलेकरांना शून्य सावलीची अनुभूती घेता येणार आहे. अकोल्यासह खामगावमध्येही २३ मे रोजी शून्य सावली अनुभवता येणार आहे. त्यापूर्वी २२ मे रोजी बुलडाण्यातही शून्य सावलीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.