फळबाग लागवड योजनेत शून्य लक्षांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:31 AM2021-05-31T11:31:55+5:302021-05-31T11:32:43+5:30
Government Scheme : योजनेचे अनुदान रखडल्याने यावर्षी जिल्ह्याला लक्षांक देण्यात आला नाही.
अकोला : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने २०१८-१९ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली; परंतु मागील दोन वर्षांपासून सुरळीत सुरू असलेल्या या योजनेचे अनुदान रखडल्याने यावर्षी जिल्ह्याला लक्षांक देण्यात आला नाही, तर रखडलेले अनुदान चुकविण्यात येत असून, लक्षांक नसल्याने यंदा नवीन शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.
सन २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येतो. ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जाते. या योजनेत तीन वर्ष कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षी अनुक्रमे ५०, ३० व २० टक्के अनुदान देण्यात येते. प्रशासकीय कारवाई पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाते. पण, या वर्षात ही योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली नाही नसून यासाठी निधी देण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळणार नाही. मागील रखडलेले अनुदानच शासनाकडून देण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
२०१८-१९ मध्ये लक्षांक
२ कोटी
मंजूर अर्ज ३९६
२०१९-२० मध्ये लक्षांक
३ कोटी ११ लाख
मंजूर अर्ज
५५८
१६ फळपिकांना अनुदान
जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये ११३ हेक्टर, तर २०१९-२० मध्ये ४९६ हेक्टर क्षेत्रात फळ पिकांची योजनेतून लागवड करण्यात आली. यामध्ये १६ फळपिकांना अनुदान देण्यात आले.
८४ लाखांचे अनुदान रखडले!
फळपीक लागवड योजनेत २०२०-२१ मध्ये ७४ लाख रुपयांचे निधी प्राप्त झाला आहे. हा निधी अनुदान देय बाकी असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आला. ८४ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान अद्याप रखडले आहे.
तांत्रिक मंजुरीत अडकले अर्ज
मागील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. यामध्ये अनेक अर्जांना पूर्वसंमतीदेखील मिळाली; मात्र ९२७ अर्जांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. बहुतांश अर्ज तांत्रिक मंजुरी मिळू शकली नाही.