जिल्हा परिषद कृषी सभापतींच्या कारला अपघात, सुदैवाने अनर्थ टळला
By संतोष येलकर | Published: September 5, 2022 02:34 PM2022-09-05T14:34:36+5:302022-09-05T14:35:05+5:30
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे अनर्थ टळला.
अकोला : पुणे येथील 'यशदा' च्या प्रशिक्षणासाठी जाताना जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापतींच्या कारला बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे अनर्थ टळला.
अकोला जिल्हा परिषद सदस्यांचे ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय प्रशिक्षण पुणे येथील 'यशदा' येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने रविवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य पुण्याकडे रवाना झाले.
पुणेकडे जात असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या एमएच ३० एच - ५१५ क्रमांकाच्या शासकीय कारचा अपघात झाला.
या अपघातात कारचे नुकसान झाले; मात्र कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. यावेळी कारमध्ये कृषी व पशुसर्वधन सभापती पंजाबराव वडाळ यांच्यासह अन्य दोन सदस्यही होते. परंतु सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नसल्याने ते सुखरूप बचावले.
दुसऱ्या कारने प्रशिक्षणासाठी गेले पुण्याला!
कारला अपघात झाल्यामुळे अपघातग्रस्त कार अकोला येथे पाठवून सभापती वडाळ सहकारी सदस्यांसोबत दुसऱ्या कारने पुणे येथील 'यशदा' कडे रवाना झाले.