जिल्हा परिषदाही होत आहेत गुन्हेगारांचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 02:24 PM2019-12-31T14:24:02+5:302019-12-31T14:24:09+5:30
मतदारांनी त्या आरोपींनाच विजयी केल्याचा प्रकार २०१७ मध्ये राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत घडला आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढणाऱ्यांच्या गुन्हेगारी माहितीचे प्रतिज्ञापत्र मतदान केंद्राबाहेर झळकत असले तरी मतदारांनी त्या आरोपींनाच विजयी केल्याचा प्रकार २०१७ मध्ये राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत घडला आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, पळवून नेणे, महिलांचे शोषण, फसवणूक, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांशी ते संबंधित आहेत. त्याची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये, याची खबरदारी घेण्याची वेळ मतदारांवर आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली वैयक्तिक माहिती मतदारांना दिसण्यासाठी मतदान केंद्रांत दर्शनी भागावर लावली जाते. मतदारांमध्ये जनजागृतीचा हा भाग आहे. निवडणूक आयोगाकडून ती जबाबदारी पार पाडली जात असली तरी मतदार मात्र, जबाबदारी विसरून आरोपींनाच विजयी करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. ही बाब राज्यातील २५ जिल्हा परिषदांची २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतून पुढे आली आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या २०१७ च्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म’ या संस्थेने प्रसिद्ध केले आहे. विजयी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रानुसार गुन्हेगारी पृष्ठभूमी, आर्थिक आणि वैयक्तिक माहिती संस्थेने घेतली. जिल्हा परिषदांच्या १,४३१ विजयी उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. राज्यातील एकूण विजयी गुन्हेगार उमेदवारांची पक्षनिहाय आकडेवारीही मतदारांच्या सदसद्विवेक बुद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. एकूण जागांपैकी १२ टक्के म्हणजे, १६६ जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केले होते. तर ९ टक्के म्हणजे, १२४ जागांवर विजयी झालेल्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. त्यापैकी १५ जणांनी खून करणे, खुनाचा प्रयत्न केला होता, तरीही त्यांना मतदारांनी विजयी केले. ही गंभीर बाब पुरोगामी राज्यात घडत आहे.
१४३१ पैकी पक्षनिहाय एकूण विजयी, आरोपी संख्या, टक्केवारी
पक्ष एकूण विजयी गुन्हेगार टक्केवारी
भाजप ३८७ ३३ ९
राष्ट्रवादी काँग्रेस ३४२ ४३ १३
काँग्रेस २९० २४ ८
शिवसेना २६५ ३९ १५
गंभीर गुन्ह्यातील आरोपी सदस्य
पक्ष सदस्य
भाजप २७
राष्ट्रवादी काँग्रेस ३२
काँग्रेस १५
शिवसेना ३१