जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मंगळवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:15 AM2019-11-17T11:15:39+5:302019-11-17T11:15:49+5:30
उमेदवार थेट अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अकोला : राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हा परिषदनिहाय वाटप करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मंत्रालयातील परिषद भवनात सोडत काढली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना बोलाविण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरलेली आहे. आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले जाते. त्यानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारणसह राखीव प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानुसार संबंधित जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव ठेवले जाते. राज्यातील ३५ जिल्हा परिषदांसाठी ही सोडत काढली जाते. ग्रामविकास विभागाकडून ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आरक्षण सोडतीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना उपस्थित राहण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.
निवडणुकीपूर्वी ठरणार आरक्षण
सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाते. ही प्रक्रिया नियमित निवडणुकीच्या काळात घडते. राज्यातील पाच जिल्हा परिषदा बरखास्त झाल्यानंतर त्यांची निवडणूकच झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ती शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आधी राखीव होणार, त्यानंतर निवडणूक असल्याने काही उमेदवार थेट अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.