‘वंचित’च्या जिल्हा परिषद समन्वय समितीने घेतला पदाधिकारी, सदस्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:14 AM2021-06-22T04:14:13+5:302021-06-22T04:14:13+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद समन्वय समितीने पक्षाच्या जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह ...
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद समन्वय समितीने पक्षाच्या जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या गत वर्षभरातील कामांचा आढावा घेण्यात आला. मतदारसंघात काय कामे केली आणि कोणती कामे केली पाहिजेत, यासंदर्भात माहिती घेण्यात आली. तसेच पदाधिकारी व सदस्यांच्या मतदारसंघात सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना आणि विकासकामांची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करून लोकाभिमुख कामे करून पारदर्शक कारभार करण्याचा सल्ला समन्वय समितीने वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना दिला. पक्ष कार्यकर्त्यांच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद समन्वय समितीचे डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, दिनकर खंडारे, जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेतील सदस्य उपस्थित होते.
सर्वसाधारण सभा पूर्वतयारीच्या
मुद्द्यावर केली चर्चा!.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २३ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत सर्वसाधारण सभेत घ्यावयाचे निर्णय आणि कामकाजासंदर्भात करण्यात आलेल्या नियोजनाची पूर्वतयारी इत्यादी मुद्द्यांवरही समन्वय समितीने पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा केली. सभेच्या कामकाजात सत्तापक्ष सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत लोकाभिमुख प्रश्न व मुद्द्यांची मांडणी करण्याचा सल्ला समन्वय समितीने यावेळी दिला.
‘सीईओं’सोबत केली चर्चा !
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद समन्वय समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या योजना व विकासकामांची अंमलबजावणी यासंदर्भात चर्चा केली. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व प्रशासनाच्या समन्वयातून योजना व विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावर प्रामुख्याने यावेळी चर्चा करण्यात आली.