जिल्हा परिषद निवडणूक : छाननीत १२१४ उमेदवारांचे १३११ अर्ज वैध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:00 PM2019-12-25T12:00:39+5:302019-12-25T12:00:44+5:30
जिल्हा परिषदेसाठी ७ उमेदवारांचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ५१२ उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले.
अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, २४ डिसेंबर रोजी करण्यात आली. छाननी प्रक्रियेत १३ उमेदवारांचे १७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, जिल्ह्यात १ हजार २१४ उमेदवारांचे १ हजार ३११ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ७ उमेदवारांचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ५१२ उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले. सातही पंचायत समित्यांसाठी ६ उमेदवारांचे ७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ७०२ उमेदवारांचे ७३८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ५१९ उमेदवारांनी ५८३ अर्ज दाखल केले, तर सात पंचायत समित्यांसाठी ७०८ उमेदवारांनी ७४५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली. छाननी प्रक्रियेत जिल्हा परिषदेसाठी ७ उमेदवारांचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ५१२ उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले. सातही पंचायत समित्यांसाठी ६ उमेदवारांचे ७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ७०२ उमेदवारांचे ७३८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.