जिल्हा परिषद निवडणूक : आता जात वैधतेसाठी लागणार कस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 02:15 PM2019-11-24T14:15:12+5:302019-11-24T14:15:38+5:30
सर्व उमेदवारांना जात वैधता प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेचे ३१ गट, पंचायत समित्यांचे ६२ गण सामाजिक आरक्षणात राखीव झाल्यानंतर त्यामध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव स्वीकारण्याला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे इच्छुकांची ऐनवेळी धांदल उडणार असल्याने सामाजिक न्याय विभागाने ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक नोडल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी शुक्रवारी सामाजिक न्याय विभागाला पत्र देत ही प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. निवडणूक आयोगाने ठरविलेल्या आरक्षणानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणुकीसाठी १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला सुरुवात होईल. राखीव जागांवर नामनिर्देशनपत्र दाखल करतानाच उमेदवारांना जात वैधता समितीकडे प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढे केलेले हमीपत्र सादर करावे लागणार आहे. ही किचकट प्रक्रिया पाहता त्याला बराच वेळ लागतो. तसेच उमेदवारांना आर्थिक, मानसिक त्रासाचाही सामना करावा लागतो; मात्र नेहमीप्रमाणेच प्रस्ताव दाखल करण्याचा गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (नामाप्र) १४ गट राखीव आहेत. जिल्हा परिषदेच्या ५३ गटांपैकी आरक्षणातील १६ गट महिलांसाठी राखीव आहेत. त्या सर्व उमेदवारांना जात वैधता प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. सोबतच सात पंचायत समित्यांच्या १०६ पैकी ६२ गण राखीव आहेत. त्यामुळे या जागांवर लढणाऱ्या उमेदवारांची किमान संख्या पाचशेपेक्षाही अधिक होणार आहे. त्या सर्वांची प्रस्ताव दाखल करण्याची घाई होणार आहे.
या गटांतील उमेदवारांना लागणार पुरावा
अनुसूचित जाती गट : सर्वसाधारण- उगवा, वरूर, राजंदा, भांबेरी, कान्हेरी सरप, सस्ती. स्त्रियांसाठी राखीव- व्याळा, पारस, हातरूण, चांदूर, बोरगाव मंजू, हातगाव.
अनुसूचित जमाती गट : सर्वसाधारण- पिंपळखुटा, जनुना. स्त्रियांसाठी राखीव- अकोली जहागीर, महान, आगर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण- अकोलखेड, लाखपुरी, घुसर, कानशिवणी, अंदुरा, देगाव, शिर्ला. स्त्रियांसाठी राखीव- दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., कुटासा, बपोरी, कुरणखेड, दगडपारवा.
शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय जात वैधता समितीला पत्र दिले. उमेदवार राखीव जागेवर निवडणूक लढवित असल्याच्या हमीपत्रासह प्रस्ताव तहसील स्तरावर घेऊन त्यावर समितीने पुढील कार्यवाही करण्याचे कळविले आहे. या प्रक्रियेत काही बदल झाल्यास तत्काळ माहिती दिली जाईल.
-प्रा. संजय खडसे, नोडल अधिकारी, जि.प.निवडणूक.