जिल्हा परिषद निवडणूक : मतदान यंत्रांना लावले ‘सील’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 01:52 PM2020-01-04T13:52:57+5:302020-01-04T13:53:04+5:30
अकोला तालुक्यातील मतदान यंत्रांना ‘सील’ लावण्यात आले असून, मतदानासाठी मतदान यंत्र तयार ठेवण्यात आले आहेत.
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत मतदानाची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये शुक्रवार, ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदाम येथे अकोला तालुक्यातील मतदान यंत्रांना ‘सील’ लावण्यात आले असून, मतदानासाठी मतदान यंत्र तयार ठेवण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली असून, सातही तालुक्यांत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतदान यंत्रांना ‘सील’ लावून मतदानासाठी मतदान यंत्र तयार ठेवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदाम येथे अकोला तालुक्यातील मतदान यंत्रांवर मतपत्रिका लावून, मतदान यंत्रांना ‘सील’ लावण्यात आले असून, मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्र तयार ठेवण्यात आले आहेत. निवडणूक निरीक्षक महेंद्रकर, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार, अकोल्याचे तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांना ‘सील’ लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.