जिल्हा परिषद निवडणूक : ‘भारिप’च्या नाराजांनी तयार केले पॅनल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:05 AM2019-12-27T11:05:45+5:302019-12-27T11:05:55+5:30
नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या १३ पेक्षा जास्त गटांमध्ये आणि पंचायत समित्यांच्या काही गणांमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना भारिप बहुजन महासंघाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पार्सल उमेदवारांविरोधात भारिप-बमसंच्या नाराज अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांमध्ये ‘पॅनल’ तयार केले असून, पार्सल उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समत्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३ पेक्षा जास्त गटांमध्ये आणि संबंधित गटांच्या पंचायत समित्यांच्या गणांमध्ये गट व गणाच्या कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत, पार्सल उमेदवारांविरुद्ध जिल्हा परिषदेच्या संबंधित गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी मिळाली नसल्याने, ‘भारिप’च्या नाराज अपक्ष उमेदवारांनी जिल्हा परिषद गटातील एक उमेदवार आणि त्या गटांतर्गत पंचायत समितीच्या दोन गणांतील दोन उमेदवार अशा तीन-तीन अपक्ष उमेदवारांचे ‘पॅनल’ तयार करण्यात आले आहे. पक्षाच्या नाराज उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत गट आणि गणांचे ‘पॅनल’ तयार केल्याने भारिप-बमसंच्या पार्सल उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केले आहे.
अपक्ष एकाच ‘बॅनर’वर लढणार निवडणूक?
कार्यक्षेत्राबाहेरील उमेदवारांना उमेदवारी देण्यात आल्याने, नाराज झालेल्या भारिप-बमसंच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांनी एकत्र येत पॅनल तयार केले आहे.
संबंधित जिल्हा परिषद गटातील एक उमेदवार आणि पंचायत समितीच्या दोन गणांतील दोन उमेदवार असे तीन अपक्ष उमेदवार एकाच ‘बॅनर’वर निवडणूक लढणार असून, त्यादृष्टीने अपक्ष उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.