जिल्हा परिषद पोटनिवडणूक; उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:38 AM2021-07-05T10:38:03+5:302021-07-05T10:38:16+5:30
:Zilla Parishad by-elections: शेवटचा दिवस असल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी उमेदवारांची झुंबड होणार आहे.
अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. शेवटचा दिवस असल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी उमेदवारांची झुंबड होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ जूनपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये ३ जूनपर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी केवळ १० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, सात पंचायत समित्यांच्या २८ गणांसाठी केवळ ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत सोमवार, ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची सोमवारी जिल्ह्यातील संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत झुंबड होणार आहे.