जिल्हा परिषद निवडणूक : उमेदवारीसाठी ‘वंचित’च्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 02:08 PM2019-12-09T14:08:16+5:302019-12-09T14:08:30+5:30
उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आॅनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हा परिषद व त्यांतर्गत सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयीच्या ठरणाऱ्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. संबंधित जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक इच्छुक उमेदवारांसह गट आणि गणाच्या क्षेत्राबाहेरील इच्छुक उमेदवारांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. दावे-प्रतिदावे करणाºया इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात दहापेक्षा जास्त दावेदार!
जिल्हा परिषद निवडणुकीत सोयीच्या ठरणाºया जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी प्रयत्न चालविले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात उमेदवारीसाठी इच्छुक दहापेक्षा जास्त उमेदवार दावेदार आहेत. त्यामध्ये संबंधित जिल्हा परिषद गटातील स्थानिक आणि गटाच्या क्षेत्राबाहेरील इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे.