कोरोनाशी लढ्यासाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:33 PM2020-03-31T17:33:34+5:302020-03-31T17:33:49+5:30
आरोग्यसेवेसाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी रुपये निधी अर्थ विभागाकडे हा निधी शनिवारी रात्री उशिरा देण्यात आला.
अकोला : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाच्या उपाययोजना तसेच आरोग्यसेवेसाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी रुपये निधी अर्थ विभागाकडे हा निधी शनिवारी रात्री उशिरा देण्यात आला. त्यातून आरोग्य विभागाच्या उपाययोजनांना बळ देण्यासोबतच त्यामध्ये सुधारणा करण्याचीही तयारी जिल्हा परिषदेने केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजणे यांच्यासह पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी ग्रामीण भागातील उपाययोजनांचा आराखडाही तयार करण्यात आला.त्यामध्ये प्राप्त निधीतून जिल्हा परिषद निधीमधून आरोग्य विभागात कार्यरत सर्वांसाठी मेडिकल किट तसेच मास्क व सॅनिटायजर्स खरेदी करून पुरवठा करण्याचा आदेशही देण्यात आला. ग्रामीण भागातील जनतेने घरातच राहावे, यासाठी प्रचार करणे, ग्रामपंचायतींनी जंतू नाशक फवारणी युद्ध पातळीवर करणे, औषध साठा उपलब्ध करण्याचेही बैठकीत ठरवण्यात आले. सोबतच तालुका पातळीवर उपलब्ध ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष तयार करणे, ग्रामीण भागातील संशयित रुग्ण जिल्हा पातळीवर न पाठवता त्यांची व्यवस्था तेथेच केली जाणार आहे. सरपंच, ग्रामसेवक,आशा स्वयंसेविकांनी बाहेरगावावरून येणाºया नागरिकांची तपासणी आरोग्य केंद्रात करून घ्यावी, ग्रामीण भागातील जनतेसाठी घरातच रहाणे व जनसंपर्क टाळण्याचा प्रसार करावा, ग्रामपंचायत स्तरावर तातडीने जंतू नाशक फवारणी करावी, जिल्ह्यात कोरोना तपासणीचे केंद्र सुरु करावे, त्यासाठी कार्यवाही करण्याचेही ठरले. त्यानुसार जिल्हा परिषदेला प्राप्त ३ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.