‘पीडब्ल्यूडी’कडे वळते केलेले ३.७५ कोटी जिल्हा परिषदेला मिळाले परत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:51+5:302021-04-05T04:16:51+5:30
अकोला : ग्रामीण रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला मंजूर निधीपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) वळता ...
अकोला : ग्रामीण रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला मंजूर निधीपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) वळता केलेला ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने मार्चअखेर हा निधी जिल्हा परिषदेला परत मिळाला आहे.
ग्रामीण रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, रस्ते दुरुस्ती कामांसाठी जिल्हा परिषदेला मंजूर असलेल्या निधीपैकी ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी गत जानेवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला होता. या निधीमधून प्रस्तावित तीन रस्ते कामांची निविदाप्रक्रिया प्रलंबित असल्याने मार्चअखेरपर्यंत अखर्चित राहिलेला ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे समर्पित केला. अखर्चित राहिलेला रस्ते दुरुस्ती कामांचा हा निधी जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयामार्फत मार्चअखेर पुन्हा जिल्हा परिषदेला देण्यात आला. त्यामुळे ग्रामीण रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते केलेले ३ कोटी ७५ लाख रुपये जिल्हा परिषदेला परत मिळाले. परत मिळालेल्या निधीमधून जिल्हा परिषदेला विकासकामांचे नियोजन करावे लागणार आहे.