जिल्हा परिषदेकडे स्मशानभूमींची माहितीच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:41+5:302020-12-25T04:15:41+5:30
संतोष येलकर....... अकोला : जिल्ह्यातील किती गावांत स्मशानभूमी आहेत, किती गावांत नाहीत, यासंदर्भात माहिती देण्यास पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून ...
संतोष येलकर.......
अकोला : जिल्ह्यातील किती गावांत स्मशानभूमी आहेत, किती गावांत नाहीत, यासंदर्भात माहिती देण्यास पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून (बीडीओ) टाळाटाळ करण्यात येत असल्याने, जिल्हा परिषदेकडे जिल्ह्यातील स्मशानभूमींची माहितीच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे स्मशानभूमी सुविधांची कामे होणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) जनसुविधा अंतर्गत जिल्ह्यातील स्मशानभूमींच्या सुविधा कामांसाठी जिल्हा परिषदेला दरवर्षी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्या अनुषंगाने जनसुविधा अंतर्गत जिल्ह्यातील स्मशानभूमींच्या कामांसाठी जिल्ह्यातील किती गावांमध्ये स्मशानभूमी आहे, किती गावांमध्ये स्मशानभूमी नाही, यासंदर्भात परिषद पंचायत विभागामार्फत वारंवार पत्रांद्वारे जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली. परंतु, गटविकास अधिकाऱ्यांकडून ही माहिती अद्यापही जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर करण्यात आली नाही. माहिती सादर करण्याच्या कामात गटविकास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने, जिल्ह्यातील किती गावांत स्मशानभूमी आहे आणि किती गावांत स्मशानभूमी नाही, याबाबतची माहिती जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमी सुविधांची कामे करणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्मशानभूमी सुविधांची
अशी केली जातात कामे!
जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी शेड, आवारभिंत, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता, पाणी, स्मशानभूमीचे साैंदर्यीकरण इत्यादी स्मशानभूमी सुविधांची कामे करण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातील स्मशानभूमींची माहितीच जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याने, ही कामे रखडली आहेत.
अनेक गावे सुविधांपासून वंचित!
कोणत्या गावात स्मशानभूमी आहे आणि कोणत्या गावात नाही, यासंदर्भात माहिती उपलब्ध नसल्याने, स्मशानभूमी नसलेल्या जिल्ह्यातील अनेक गावांना जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
तालुकानिहाय अशी आहेत गावे!
तालुका गावे
अकोला १७६
अकोट १४८
बाळापूर ८७
बार्शिटाकळी १२६
मूर्तिजापूर १४९
पातूर ८३
तेल्हारा ९३
.........................................
एकूण ८६२