जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; दुपारपर्यंत ३१.७२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 02:42 PM2020-01-07T14:42:57+5:302020-01-07T14:44:12+5:30
दुपारी दीड वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ३१.७२ टक्के मतदान झाले.
अकोला : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवार, ७ जानेवारी मतदान होत असून, दुपारी दीड वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ३१.७२ टक्के मतदान झाले.
जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसह सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांमध्ये निवडणूक रिंगणातील ७६९ उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार १९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजतापासून मतदानास शांततेत सुरुवात झाली. मतदान प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या ५३ गटांतील २७७ आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांमधील ४९२ अशा एकूण ७६९ उमेदवारांचे भवितव्य जिल्ह्यातील ८ लाख ४८ हजार ७०२ मतदार ठरविणार आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरु असून, दुपारनंतर मतदानासाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे काही वेळ मतदान थांबल्याचे वृत्त होते. दुपारी दिड वाजेपर्यंत जिल्हाभरातील सर्वच केंद्रांवर सरासरी ३१.७२ टक्के मतदान झाले. अकोला तालुक्यात ३३.०५ टक्के, अकोट - ३२.७१ टक्के, तेल्हारा - ३३.११ टक्के, मुर्तीजापूर ३०.५४ टक्के, बाळापूर -३०.२१ टक्के, बार्शीटाकळी - २८.६२ टक्के तर पातूर तालुक्यात ३३.३१ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.