अखेर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे ‘रोस्टर’ तयार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:37+5:302021-09-24T04:22:37+5:30
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली (रोस्टर) अखेर ...
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली (रोस्टर) अखेर तयार करण्यात आली असून, ७ ऑक्टोबरला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बिंदुनामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्गीय कक्षाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांची दरवर्षी प्रवर्गनिहाय बिंदुनामावली तयार करण्यात येते. परंतु जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली तयार करणे आणि बिंदुनामावलीस विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्गीय कक्षाकडून मान्यता घेण्याची प्रक्रिया २०१९ पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत रखडली आहे. बिंदुनामावलीची प्रक्रिया रखडल्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रियादेखील रखडली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मराठी व उर्दू माध्यमाच्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बिंदुनामावली अखेर तयार करण्यात आली असून, ७ ऑक्टोबर रोजी बिंदुनामावलीचा प्रस्ताव अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्गीय कक्षाकडे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सादर करण्यात येणार आहे.
पदोन्नती, बदलींचा मार्ग होणार मोकळा!
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली मंजूर करण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद अंतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती, आंतरजिल्हा बदली, तसेच पद भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
.........................................................
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसह शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बिंदुनामावली तयार करण्यात आली असून, ७ ऑक्टोबरला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्गीय कक्षाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांची बिंदुनामावली आठवडाभरात तयार करण्यात येणार आहे.
वैशाली ठग
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद.