जिल्हा परिषद :योजनांसाठी लाभार्थींची सोडतीद्वारे निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:50 PM2019-08-02T13:50:27+5:302019-08-02T13:50:36+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून राबविल्या जाणाऱ्या विविध विभागाच्या योजनांसाठी लाभार्थींची निवड चिठ्ठीद्वारे सोडतीने करण्यात आली.
अकोला : जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून राबविल्या जाणाऱ्या विविध विभागाच्या योजनांसाठी लाभार्थींची निवड चिठ्ठीद्वारे सोडतीने करण्यात आली. त्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण विभागाची लाभार्थी यादी लक्ष्यांकापेक्षा अर्ज कमी असल्याने आधीच प्रसिद्ध करण्यात आली. चिठ्ठीद्वारे सोडतीने लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेत प्रथमच राबविण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या उपकरातून विविध विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनांसाठी प्राप्त अर्जांच्या छाननीतून पात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतीवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. गुरुवारी चिठ्ठी सोडत पद्धतीने लाभार्थी निवड केली जाईल, असेही ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया आणि वेळापत्रकही ठरवून त्यानुसार प्रशासकीय स्तरावर मंजुरीपर्यंतची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागांसह पंचायत समित्यांना दिले. त्यानुसार कृषी विभागाकडे असलेल्या ५७ लाख ५० हजारांच्या निधीतून लाभ मिळण्यासाठी तब्बल ४,२७३ अर्ज प्राप्त झाले. पात्र अर्जांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. पात्र अर्जांची संख्या आणि त्या तुलनेत द्यावयाचा लाभ, हे प्रमाण अल्प असल्याने चिठ्ठी सोडतीने निवड करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात राबविण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे व कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे उपस्थित होते. सभागृहात उपस्थित असणारे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डोळे बंद करून बरणीतील चिठ्ठ्या उचलल्या. त्यामध्ये असलेल्या नावाची निवड त्या लाभासाठी करण्यात आली.
- तालुकानिहाय निश्चित लाभार्थी
शेळीगटासाठी अकोला तालुक्यात पात्र १०६ अर्जांपैकी ८, तेल्हारा-२७ पैकी ५, पातूर १६ पैकी ५, बार्शीटाकळी ८१ पैकी ५, बाळापूर ६ पैकी ५ अकोट ३४ पैकी ७, मूर्तिजापूर २८ पैकी ७ लाभार्थींची निवड झाली आहे. गोठा बांधणीसाठी तेल्हारा-३, मूर्तिजापूर ११ पैकी ४, बाळापूर १० पैकी ३, अकोट ३२ पैकी ४, अकोला ४९ पैकी ५ लाभार्थींची निवड झाली. बोकूड वाटपासाठी ८२ पात्र लाभार्थींपैकी ७० जणांची निवड करण्यात आली. सोबतच डीझल पंप पाच एचपीसाठी २६४, ओपनवेल सबमर्सिबल पंप-५५९, पाच एचपी सबमर्सिबल-१८७, प्लास्टिक ताडपत्री-३६८, प्लास्टिक ताडपत्री-१८९९, एचडीपीई पाइप-६५२, स्पायरल सेपरेटर-३४४ अर्जांतून लाभार्थी निवड करण्यात आली.