जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नत्या प्रलंबितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:33+5:302021-04-14T04:17:33+5:30
अकोला : जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील पदोन्नतीस पात्र शिक्षकांच्या गत दहा वर्षांपासून पदोन्नत्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पदोन्नती मिळणार तरी ...
अकोला : जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील पदोन्नतीस पात्र शिक्षकांच्या गत दहा वर्षांपासून पदोन्नत्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पदोन्नती मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील पात्र ३७० शिक्षकांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत सेवेची बारा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात येते; परंतु २०११ नंतर गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील पदोन्नतीस पात्र विषय शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व उच्चश्रेणी मुख्याध्यापक इत्यादी संवर्गातील शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. १८ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती देण्यात आल्या. मात्र, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया अद्यापही रखडली आहे. त्यामुळे पदोन्नती मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील पदोन्नतीस पात्र ३७० शिक्षकांकडून प्रतीक्षा केली जात आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागामार्फत पदोन्नतीस पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार, याकडे आता शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
पदोन्नती प्रलंबित असलेल्या
शिक्षकांची अशी आहे संख्या!
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत २०० विषय शिक्षक, ६५ केंद्रप्रमुख, ३५ विस्तार अधिकारी (शिक्षण) आणि ७० उच्चश्रेणी मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे.