जिल्हा परिषद, स्थानिक स्तर विभागाची टोलवाटोलवी
By Admin | Published: November 18, 2016 02:09 AM2016-11-18T02:09:11+5:302016-11-18T02:09:11+5:30
कोल्हापुरी बंधा-यांचा कागदोपत्री फार्स
अकोला, दि. १७- शेतकर्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक समस्यांवरचा उपाय असलेल्या सिंचनाच्या सोयीकडे शासनासह जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभाग किती सहजतेने दुर्लक्ष करीत आहेत, ही बाब गेल्या अनेक वर्षांंंंपासून प्रत्यक्षात काम न करता केलेल्या कागदोपत्री फार्सवरून दिसत आहे. स्थानिक स्तरकडे दिलेले तब्बल ८४ पैकी ७0 बंधारे अद्यापही जिल्हा परिषदेकडे नाहीत. एवढेच काय, त्याची माहितीही जिल्हा परिषदेत नसल्याचा गंभीर प्रकार उघड होत आहे. त्याचवेळी बंधारे हस्तांतरणासाठी स्थानिक स्तरकडून पत्रव्यवहार सुरू असल्याचे दाखविले जाते, हा विरोधाभासही घडत आहे.
जिल्हा परिषदेच्या ८४ बंधार्यांची कामे स्थानिक स्तरकडे देण्यात आली. त्यापैकी केवळ १४ कामे जिल्हा परिषदेला हस्तांतरित केली. उर्वरित कामे हस्तांतरित करा, असे जिल्हा परिषदेने सातत्याने या विभागाला सांगितल्याचा दावा केला जात आहे. लघुसिंचन विभागाने लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) या विभागाकडे २00४-0५ मध्ये सोपविलेली कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यावर एक कोटी रुपये खर्च झाले आहेत; मात्र ती कामे अपूर्ण असल्याने सिंचनासाठी त्याचा कुठलाही लाभ झालेला नाही. त्या चार कामांसोबत इतरही नऊ कामांमध्ये एकूण १ कोटी ८८ लाख रुपये निधी अडकलेला आहे. ही कामे देताना झालेल्या बी-१ करारनाम्यातील अट क्रमांक तीनचा भंग करण्यात आला. वेळेत काम पूर्ण करणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एकीकडे हे चित्र असताना स्थानिक स्तर विभागाने बंधारे हस्तांतरणासाठी सातत्याने पत्रव्यवहार केल्याचे म्हटले आहे; मात्र जिल्हा परिषद दाद देत नसल्याचे त्या विभागाचे म्हणणे आहे.
एप्रिल २0१४ पासून पत्रव्यवहार
जिल्हा परिषदेकडून बंधारे हस्तांतरणासाठी मागणी सुरू आहे. असे असताना स्थानिक स्तरने २९ एप्रिल २0१४ पासून ७ नोव्हेंबर २0१६ या काळात तब्बल सात पत्रे पाठवून बंधारे हस्तांतरित करून घेण्याची आठवण जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाला करून दिली आहे; मात्र यामध्ये नेमके काय घडत आहे, बंधारे हस्तांतरण का रखडले, याकडे पाहता दोन्ही विभागाचा सुरू असलेला कागदोपत्री फार्स असल्याचेच दिसत आहे.
सर्वाधिक पावसानंतरही बंधार्यात पाणी नाही
यावर्षी गेल्या काही वर्षांंंंंच्या तुलनेत चांगलाच पाऊस झाला आहे. त्या पावसाने धरणे, तलाव तुडुंब आहेत. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या कोल्हापुरी बंधार्यांत थेंबभर पाणीही नाही, ही शोकांतिकाही आहे.